नांदेडमधील शिवसेना आमदार महावितरणच्या मुख्यालयासमोर करणार उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

विद्युत रोहित्रांची कमी संख्या व जळाल्यानंतर तातडीने पर्याय उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना आमदार सुभाष साबणे, नागेश पाटील आष्टीकर व हेमंत पाटील सोमवारी महावितरणच्या नांदेड मुख्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. ऊर्जा खाते भाजपाकडे असल्याने हे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून हे तिन्ही आमदार उपोषणाला बसणार आहेत.

महावितरणकडून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी लागणारे पाणी गावठाणातील विद्युत व पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत रोहित्र व डीपींची संख्या नांदेड परिमंडळात खूप कमी आहे. या तिन्ही आमदारांनी काही दिवसापूर्वीच नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मागणी हजार डीपींची आणि मिळणार केवळ दोनशे, अशी परिस्थिती असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डीपीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी डीपी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कृषी पंपाच्या मोटारी बंद राहत आहे. महावितरणच्या या समस्येमुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची तिव्रता वाढत असून शेतात पाण्याअभावी पिके वाळून जात आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. महावितरण अधिकाNयांच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रश्न उदभवल्यामुळे देगलूरचे आमदार सुभाष साबणे, हदगावचे आमदार नागेश पाटील आष्टीकर व नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील हे तिघेही सोमवारी ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी नांदेड परिमंडळ कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहेत.