झुकेंगे नहीं… झुकाएंगे ! शिवसेना नेते संजय राऊत यांचे तुफानी प्रत्युत्तर; भाजपवर बॉम्ब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांविरुद्ध कालाकांडी करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज तुफानी प्रत्युत्तर दिले. शिवसेना भवनातील ‘आंतरराष्ट्रीय’ पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी भाजपवर बॉम्बवर्षावच केला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करतानाच या पिता-पुत्राचे पीएमसी बँक घोटाळय़ाचा आरोपी राकेश वाधवान याच्याशी कसे आर्थिक हितसंबंध आहेत याची कुंडलीच राऊत यांनी मांडली. दोन्ही सोमय्यांना तत्काळ अटक करावी अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे. ‘हम डरेंगे नहीं, झुकेंगे नहीं… झुकाएंगे..’ असे बजावतानाच राऊत यांनी हा फक्त ट्रेलर आहे. व्हिडीओ आणि क्लिप, कागदपत्रे घेऊन पुन्हा येईन असा खणखणीत इशाराच भाजपला दिला आहे.

महाराष्ट्रातील सरकार पाडायचेच यासाठी भाजपचे आकांडतांडव सुरू आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा कामाला जुंपल्याचेही चित्र आहे. राज्य सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांवर पडणाऱ्या धाडी, होणारी चौकशी हा त्याचाच एक भाग मानला जातो. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज एका खास पत्रकार परिषदेत तपास यंत्रणा आणि भाजपच्या कारस्थानाच्या चिंधडय़ा उडवल्या. राऊत यांच्या भात्यात जणू आज बाण नव्हते तर ‘मिसाईल’ होती.

खासदार संजय राऊत यांनी ठाकरे कुटुंबीय,  श्रीधर पाटणकर कुटुंबीय, शिवसेना नेते तसेच राऊत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांना केंद्रीय तपास यंत्रणाकडून दिला जाणारा त्रास व धमक्या यावर सविस्तर भाष्य केले.

शिवसेना घाबरणार नाही

या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय तपास यंत्रणांना आम्हाला संदेश द्यायचा आहे की, महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही आणि तुम्ही कितीही नामर्दपणे आमच्या पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, ठाकरे परिवार, आनंदराव अडसूळ, रवींद्र वायकर, अनिल परब, भावना गवळी तसेच शिवसेनेचे अनेक नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबीयांपासून  सर्वांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करीत आहेत हे महाराष्ट्रवरच नव्हे तर देशावर संकट आहे.

तर टाईट–फिक्स करू

 वीस दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख लोक मला तीनवेळा भेटले आणि त्यांनी वारंवार तुम्ही या सरकारमधून बाहेर पडा असे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सरकार पाडायचे आहे. आमची संपूर्ण तयार झाली आहे. एक तर आम्ही राष्ट्रपती राजवट आणू  किंवा आमच्या हाताला लागणारे आमदार फोडून हे सरकार पाडू अशी धमकी दिली होती. आमचे सरकार येण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असे भाजपचे लोक मला सांगत होते. आमचे बहुमत असताना तुम्ही आमचे सरकार कसे काय उद्ध्वस्त करू शकता असा प्रश्न मी त्यांना केला तेव्हा तुम्ही काही लोकांनी मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट-फिक्स करतील अशीही धमकी दिली. त्या लोकांची नावे मी आता घेणार नाही पण त्या संदर्भात दिल्लीतून सर्व सिद्धता झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही मदत केली नाही तर तुम्हाला पश्चात्ताप होईल अशी धमकी दिली होती. मात्र तुम्ही काहीही धमकी दिली तरी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला नख लागेल असे कोणतेही कृत्य माझ्याकडून होणार नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे राऊत म्हणाले.

तर ठिणगी पडेल

सध्या पवार कुटुंबीयांवर पडणाऱ्या धाडींचा संदर्भ देत संजय राऊत पुढे म्हणाले की, ईडीचे लोक त्यांच्या मुलींच्या, बहिणींच्या  घरात आठ दिवस ठाण मांडून बसले. मी भाजपच्या लोकांना सांगितले की तुम्ही या भानगडीत पडू नका.आम्ही प्रतिकार करू. सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल. त्यावर आम्ही ईडी, केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोडीला केंद्रीय पोलीस दल आणू असे सांगितले. आणि तिसऱ्या दिवशी माझ्या आसपासच्या लोकांवर पहाटे तीन-चार वाजता अत्यंत वाईट पद्धतीने ईडीच्या धाडी पडायला लागल्या. त्याआधी मुलुंडच्या दलालाने पत्रकार परिषद घेतली आणि संजय राऊत यांच्या घरी ईडीचे लोक पोहचणार. त्यांना अटक होणार असे सांगू लागला. महाराष्ट्रात तुमचे सरकार आले नाही म्हणून  केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून आम्हाला अशा प्रकारे त्रास देतात, पण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला अशा प्रकारे गुडघे टेकायला शिकवले नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात निर्घृण राजकारण

तुम्ही काहीही करा पण हे सरकार पडणार नाही हे मी त्यांना जेव्हा जेव्हा   सांगितले तेव्हा तेव्हा माझ्या नातेवाईकांच्या घरी ईडीच्या धाडी पडायला सुरु झाल्या. मला गोवण्यासाठी माझ्या आजूबाजूच्या लोकांवर धाडी पडू लागल्या.  जे आरोप माझ्यावर झाले आहेत त्यातील एकही आरोप, त्यातील एकही प्रकरण खरे नाही. मुळात मराठी माणसाने धंदा करू नये असे या लोकांना वाटते म्हणून माझे मित्र-नातेवाईकांना बदनाम केले जाते. तुमच्या वडिलांना अटक होईल असे फोन त्यांना केले जातात. अतिशय निर्घृण पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रात सुरु असल्याचे ते म्हणाले.

शेवट ईडी कार्यालयाबाहेर

शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या खोटय़ा आरोपांचाही त्यांनी पर्दाफाश केला. वास्तविक शिवसेना भवनाऐवजी मी ईडीच्या कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेणार होतो. पण सुरुवात शिवसेना भवनातून आणि शेवट ईडीच्या कार्यालयासमोर करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे ते म्हणाले.

मराठी भाषेचा द्वेष्टा

शालेय शिक्षणात मराठी भाषा सक्तीची असू नये म्हणून याच किरीट सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमच्या मराठी भाषेच्या विरुद्ध हा माणूस कोर्टात गेला होता. भाजपच्या या फ्रंटमॅनकडून आपण काय अपेक्षा करणार आणि हीच लोकं मुंबईत मराठी कट्टा हा उपक्रम चालवतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गुजरातमधील 25 हजार कोटींच्या घोटाळय़ाकडे डोळेझाक

‘माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाले, पताकावाले आणि अगदी मेहंदीवाल्याकडेही ईडीचे अधिकारी चौकशीसाठी गेले होते. लग्नाचे कपडे शिवले त्या मुलुंडच्या टेलरकडेही गेले होते. आता फक्त चप्पलवाल्याकडे जायचे राहिले आहेत. पण गुजरातमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला त्यावर मात्र कुणीच बोलत नाही. भाजपच्या एका माजी वनमंत्र्याने त्याच्या मुलीच्या लग्नात जंगलाचा फील यावा म्हणून अंथरलेले कार्पेट साडेनऊ कोटी रुपयांचे होते. आता घरातले लग्न आहे. आम्ही कोणाच्या घरात जात नाही. पण हे लोक आमच्या मुलांच्या घरात, दुकानात, कार्यालयात शिरतात. जे करायचे ते करा. तुरुंगात टाकणार असाल तर टाका पण माझ्यासोबत तुम्हीही असाल.’ असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

‘ते’ साडेतीन लोक कोण, उद्यापासून कळेल

भाजपचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील असे संजय राऊत म्हणाले होते. त्या साडेतीन लोकांबद्दल प्रसारमाध्यमांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील नागरिकांनाही उत्सुकता होती. सोशल मीडियावर अनेकांच्या नावांचा अंदाज लावत चर्चाही सुरू झाली होती. पत्रकार परिषद संपत आली तरी संजय राऊत यांनी साडेतीन लोकांबद्दल काहीच न सांगितल्याने पत्रकारांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राऊत यांनी आपले बोलणे पूर्ण केल्यानंतर पत्रकारांनी ‘साडेतीन…साडेतीन…’ अशी विचारणा त्यांना केली. त्यावर ‘उद्यापासून तुम्हाला कळेल. कुणी अर्धा, कुणी पाव तर कुणी चारआणे आहे. जसजसे आत घुसत जाऊ तसतसे कळत जाईल,’ असे सूचक उत्तर राऊत यांनी दिले.

हरयाणाचा दूधवाला  ‘श्रीमंत’ कसा झाला?

हरयाणातील दूधवाल्याचे आणि भाजपचे कनेक्शन यांचा लेखाजोखाच खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडला. ते म्हणाले, हरयाणातील एस. नरवर नावाच्या दूधवाल्याने फक्त पाच वर्षांत तब्बल 7 हजार कोटी रुपये कमावले. कसे शक्य झाले त्याला हे? केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर हा चमत्कार घडला आहे. नरवर याचे महाराष्ट्रात येणे-जाणे सुरू झाले. त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे? कोणी केले हे मनी लॉण्ड्रिंग? नरवरकडे महाराष्ट्रातून साडेतीन हजार कोटी रुपये गेल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला.

या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते दिवाकर रावते, आनंदराव अडसूळ, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेता व खासदार अरविंद सावंत, उपनेता मीना कांबळी, शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार राहुल शेवाळे, प्रियांका चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

सर्वांचे नोटिंग झालेय, याद राखा! बघू 2024 मध्ये

शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना ईडीकडून होत असलेल्या त्रासाचाही समाचार संजय राऊत यांनी यावेळी घेतला. ‘आनंदराव अडसूळ, भावना गवळी, अनिल परब, रवींद्र वायकर यांच्यानंतर आता ईडीवाले माझ्या मागे लागले आहेत. मी कधीच चुकीचे काम केले नाही. आज सकाळी माझ्या बँकेत गेले होते ईडीवाले आणि गेल्या 20 वर्षांची स्टेटमेंट्स घेऊन गेले. माझे गाव अलिबागमध्ये आहे. तिथे माझी 50 गुंठे जमीन आहे. तिची किंमत 40 लाख असेल. गेल्या 15 दिवसांपासून ईडीचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. ती जमीन ज्यांच्याकडून घेतली त्यांना पहाटे चार वाजता घरात घुसून ईडीचे अधिकारी चौकशीसाठी घेऊन गेले आणि संजय राऊत यांना किती रक्कम दिली ते लिहून दे अशी सक्ती करत आहेत. मला तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे.’ असे सांगतानाच ‘सर्वांचे नोटिंग झालेय, बघू 2024 मध्ये’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

शिवसेना भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी थेट वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. पत्रकार परिषदेत  मांडलेल्या विविध मुद्दय़ांवर त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण?

‘जितेंद्र चंद्रलाल नवलानी’ हा माणूस कोण आहे, असा सवाल खासदार राऊत यांनी ‘ईडी’ला केला. नवलानीचे नाव ऐकताच पत्रकार परिषद पाहत असणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांना नक्कीच घाम फुटला असेल. कारण नवलानी हा ईडीचा वसुली एजंट असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. नवलानीप्रमाणेच फरीद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण आहेत याचेही उत्तर ईडीने द्यावे. हे चौघेही जण ईडीचे एजंट असून गेल्या चार महिन्यांत मुंबईतील 70 प्रतिष्ठत बिल्डरांकडून त्यांनी 300 कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती राऊत यांनी दिली. ईडीचे अधिकारी कुठे जातात, कुठे खाता-पितात, अय्याशी करतात याची कुंडलीच आपल्याकडे असून लवकरच ते पुराव्यासह मांडू, असेही राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.

सोमय्या ईडीचे वसुली एजंट

पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. ही सर्व कागदपत्रे गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा मी ईडीकडे पाठवली, असे संजय राऊत यांनी सांगितले. सोमय्या हे ईडीचे वसुली एजंट असून ईडीच्या कार्यालयात बसून दही आणि खिचडी खात असतात, असा आरोपही त्यांनी केला.

राऊत यांचा सर्जिकल स्ट्राइक; निकॉन इन्फ्रा कंपनीत नील आणि राकेश वाधवान पार्टनर

किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा नील सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. सोमय्या कुटुंबाची कंपनी, त्यासाठी कुठून पैसा आला, जमीन कशी घेतली, त्यात भागीदार कोण याची कुंडलीच त्यांनी मांडली. ईडीवाले आणि सीबीआयवाल्यांनीही हे ऐकावे, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांनी सांगितले की, ‘निकॉन इफ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान याचे आपल्याशी संबंध असल्याचे किरीट सोमय्या सांगत असतात. पण याच वाधवानची निकॉन इफ्रामध्ये पार्टनरशिप आहे. त्याच्या खात्यातून भाजपच्या खात्यात पक्ष निधी म्हणून वीस कोटी रुपये गेलेत. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून त्याच्याकडून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईतील गोखिवरे येथे देवेंद्र लधानी याच्या नावावर 400 कोटींची जमीन फक्त साडेचार कोटी रुपयांना घेतली. त्या जमिनीवर निकॉन इफ्रा कंपनी आहे आणि तिचा संचालक सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आहे. सोमय्यांनी तिथे हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. निकॉन फेज-1 आणि फेज-2.’

पर्यावरणाचे नियम धाब्यावर

‘निकॉन फेजमध्ये सगळा पीएमसी बँकेचा पैसा आहे.’ पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निकॉन इफ्राने प्रकल्प उभारले आहेत. त्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. राष्ट्रीय हरित लवादाने कारवाई केली तर सोमय्यांना दोनशे कोटी रुपयांचा दंड होईल. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने त्यात लक्ष घालावे तसेच किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटक करण्यात यावी’, असेही संजय राऊत म्हणाले.

फडणवीसांचे खासम्खास; मोहित कंबोज यांचे पत्राचाळ आणि पीएमसी बँक घोटाळा कनेक्शन

देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत लाडका म्हजेच ‘ब्ल्यू आईड बॉय’ असणारा मोहित कंबोज यांचे पत्रा चाळ आणि पीएमसी बँक घोटाळय़ाशी कनेक्शन असल्याचे शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. मोहित कंबोज फडणवीस यांना एक दिवस बुडवणार असल्याचे ते म्हणाले. पत्रा चाळ घोटाळय़ाचा जो विषय काढला जातोय ती जमीन मोहित कंबोज यांनीच खरेदी केली. पत्रा चाळ प्रकल्पात पीएमसी बँकेचे पैसे लागले आहेत. पीएमसी बँकेला बुडवून पत्रा चाळीची जागा विकत घेण्यात आली. त्या ठिकाणी लक्झर कन्स्ट्रक्शन नावाने कंबोज यांचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

राकेश वाधवान याच्याकडून मोहित कंबोजच्या केबीजी ग्रुपने 1 लाख 65 हजार स्क्वेअर मीटरपैकी 4557 स्क्वेअर मीटर जागा 100 कोटींमध्ये घेतली. या जागेची किंमत साधारण 12 हजार कोटी आहे. कंबोज बायोफार्मिंग प्रा. लि., केबीजी व्हेंचर्स, आयर्न मॅन रिअल इस्टेट, तीर्थ एक्सपिरिअन्स प्रा. लि., केबीजी हॉटेल्स, स्टिक फिल्म कंपनी, शिवादी हॉटेल्स, काळभैरव व्हेंचर्स, मॅक्स मीडिया सोल्युशन्स, पीएम रिऍलिटी या सगळ्यात कुणाचा पैसा लागला आहे? हा पैसा कुठून आला? असा सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

19 बंगले दाखवा नाहीतर जोडे खा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवारावर आरोप होत आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही. मी सर्वांना सत्य बाजू सांगतो. ठाकरे कुटुंबीयांनी अलिबागजवळील कोर्लई गावात 19 बंगले बांधले असा आरोप मुलुंडमधील तो दलाल करतो. आपण चार बस काढून त्या ठिकाणी पिकनिकला जाऊया. पत्रकारांनीही पिकनिकला यावे.  तिथे बंगले असतील तर मी राजकारण सोडेन आणि नसतील तर त्या दलालाला शिवसेना जोडय़ाने मारेल असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. खोटेपणाचा कळस आणि भंपकपणा करायचा प्रकार सुरू आहे, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला.

श्रीधर पाटणकरांवरील आरोप खोडले

श्रीधर पाटणकर यांनी देवस्थानाच्या जमिनी लाटल्या असा आरोप होतो. पण पाटणकर यांनी देवस्थानाची जमीन कशी व कधी घेतली ते दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी यावेळी दिले. जी जमीन दाखवली जाते ती जमीन त्यांनी ज्यांच्याकडून घेतली त्यांचा व देवस्थानाचा काही  संबंध नाही. त्यांनी 2014मध्ये जमीन कोणत्या व्यक्तीकडून घेतली त्यांच्या नावांची यादीच संजय राऊत यांनी सादर केली. या यादीतील बाराव्या क्रमांकाच्या व्यक्तीकडून त्यांनी जमीन घेतल्याचे ते म्हणाले.

फडणवीसांच्या काळात 25 हजार कोटींचा महाआयटी घोटाळा

राज्यात भाजपचे सरकार असताना फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. अमोल काळे आहे कुठे? विजय दवंगडे काय प्रकरण आहे? विनाटेंडर कोणाकोणाला कंत्राटं दिली गेली? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणातील पाच हजार कोटींचा हिशेब माझ्याकडे आलेला आहे. याबाबतची सगळी माहिती संबंधित तपास यंत्रणांकडे देणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

दणके आणि फटके

  • महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेइमान नाही. नामर्दानगी करून पाठीमागून वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही.
  • महाराष्ट्रातील सरकार पाडायचे आहे म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे.
  • आमच्याकडे 170 आमदारांचे बहुमत असतानाही भाजपवाले दर दोन दिवसांनी सरकार पाडण्याची तारीख देतात. कोणाच्या भरवशावर या तारखा देताय?
  • शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेने  सुरुवात झाली आहे, याचा शेवट  ईडी कार्यालयासमोरील पत्रकार परिषदेने होईल.
  • शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवलेले नाही.
  • शाळेत मराठी भाषा सक्तीविरोधात कोर्टात गेलेला किरीट सोमय्या भाजपचा ‘फ्रंट मॅन?’ आणि भाजपवाले ‘मराठी कट्टा’ चालवतायत?
  • केंद्रीय तपास यंत्रणांनी कुठे जायचे तिकडे जावे. तुमची टक्कर शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा.
  • महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे.