आमदारांच्या अपात्रतेबाबत आधी निर्णय घ्या! उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दावर पहिले फैसला व्हावा, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. मुंबईमध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गेले 6-7 महिने शिवसेनेने कशा पद्धतीने न्यायालयीन लढाई लढली हे विस्ताराने सांगितले. जनतेच्या मनात असंख्य प्रश्न असून त्यांच्या मनात कोणतीही शंका राहू नयेत, त्यांना वस्तुस्थिती कळावी यासाठी आपण हे सगळे विस्ताराने सांगत असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘कोंबडे आधी का अंडे हा प्रश्न राहतोच. 20 जूनला पक्षादेश मोडून विधानपरिषदेच्या निवडणुकीत गद्दारी केली आणि पळून गेले हे अत्यंत नीच आणि विकृत कृत्य आहे. सर्वात आधी आपात्रतेचा फैसला व्हायला हवा कारण हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यानंतर जुलै महिन्यात गद्दारांचा गट निवडणूक आयोगासमोर गेला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की अपात्रतेचा फैसला लवकर व्हायला हवा. ते अपात्र होणार असतील तर मग त्यांचा निवडणूक आयोगासमोरील दावा आयोग कसा काय ग्राह्य धरू शकेल. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल लागू नये असे आमचे मत आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्यास सांगितले होते. शिवसेनेचे म्हणणे लेखी स्वरुपात निवडणूक आयोगासमोर सादर केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, ‘पक्ष हा जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो,पक्ष निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर मला वाटतं की उद्या कोणीही..जगातील 2-3 नंबरचे उद्योगपती, आमदार खासदार फोडून देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री होऊ शकतात, त्याला काही अर्थ नाही त्याला गद्दारी म्हणतात.’

निवडणूक आयोगासमोर आमची बाजू मजबूत आहे. आयोगाने पक्षाच्या चिन्हाबाबत पहिले आदेश दिला. निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आमची अपेक्षा आहे. मात्र जर असे झाले नाही आणि सर्वोच्च न्यायलयात गद्दार हे अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे काय होणार ? अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दोन्ही गोठवले. गद्दारांनी ना अंधेरीची पोटनिवडणूक लढवली ना आता होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुका ते लढवत आहे, मग नाव आणि चिन्हं का गोठवले हा प्रश्न आहे? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे अपात्रतेबाबतचा निर्णय आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने जे सांगितलेले आहे ते आम्ही सादर केले आहे. ते पाहिल्यानंतर गद्दारांनी अचानक सांगितले की आमच्याकडे आमदार आणि खासदार जास्त आहेत. ओसरीत आसरा दिला तर त्याने घरावर अधिकार सांगितला असा हा प्रकार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाला नम्र विनंती आहे, अधिकार आपला आहात मात्र आपण लोकशाहीचे रक्षक आहात. त्यामुळे लोकशाहीचे रक्षण करणे हे आपल्याशिवाय कोण करणार, त्यामुळे लोकशाहीवर होत असलेल्या उघडउघड अत्याचारापासून लोकशाहीला वाचवा.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मिंधे गटापुढे दोन पर्याय होते पहिला म्हणजे वेगळा पक्ष स्थापन करण्याचा आणि दुसरा म्हणजे उघडपणे भाजपमध्ये जाण्याचा. मात्र आता मिंधे गट जाऊ शकत नाही कारण त्यांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या मागचा ससेमिरा वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये जाऊ शकले असते. मात्र तसे ते न गेल्याने भाजपने त्यांना मधल्यामध्ये लटकवून ठेवले आहे.