
चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये जे जिंकले त्यांचे अभिनंदन. आता 2024 ची निवडणूक महत्त्वाची आहे. आज कितीही जिंकला असलात तरी 2024 मध्ये महाराष्ट्रात याच, असे खुले आव्हान देतानाच, कितीही वादळे आली तरी ती पचवण्याची ताकद या महाराष्ट्रात असून लोकशाहीवर घोंघावणारे वादळही महाराष्ट्र परतवून लावेल, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भारतीय जनता पक्षाला दिला.
शिवसेनेच्या नवनियुक्त नेत्यांचा सन्मान विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाटय़गृह येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. चार राज्यांच्या निवडणूक निकालांवरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. ‘निवडणुकांमध्ये जे जिंकले त्यांचे मोकळय़ा मनाने अभिनंदन करतो. निकाल कुणाला अपेक्षित-अनपेक्षित होते ते त्यांचे बघतील, पण आता जशा निवडणुका होताहेत तशाच 2024 नंतरही होत राहिल्या पाहिजेत. यालाच लोकशाही म्हणतात आणि ती टिकवण्यासाठीच शिवसेना लढतेय,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दिले की माणसं निघून जातात, म्हणून द्यायलाही भीती वाटू लागली
प्रत्येक वेळेला सर्वांना सर्वकाही देता येते असे नाही. हल्ली तर एक पद्धत अशी झाली की, कुणाला दिले की तो जातो. म्हणून काही वेळेला देतानाही भीती वाटते. पण संजय पोतनीस यांच्याबद्दल मला अभिमान आहे. कारण विभागप्रमुख आणि आमदारकी अशी दोन्ही पदे त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.
या सोहळय़ावेळी माजी पेंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाबुल सुप्रियो हेसुद्धा व्यासपीठावर होते. भाजपमधील हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवून बाहेर पडलेले सुप्रियो यांचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी काwतुक केले. सत्ताधाऱयांविरुद्ध उभे राहणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, असे ते म्हणाले. अन्यायाविरुद्ध लढण्याची महाराष्ट्र आणि बंगालची परंपराच आहे, स्वातंत्र्यलढय़ात याच महाराष्ट्र आणि बंगालने देशाला सर्वाधिक क्रांतिकारी दिले आणि ती परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे गटावरही आसुड ओढले. जे मिंधे गेलेत तिकडे त्यांना आपण काय करतोय हेच कळत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सभागृहातून ‘गद्दाररररर’ असा आवाज आला. पण मिंधे केवळ शिवसेनेशी नाही तर महाराष्ट्राच्या मातीशी आणि मातेशी गद्दारी करत आहेत, सत्तेच्या स्वार्थासाठी दुसऱयाच्या घरची धुणीभांडी करताहेत. महाराष्ट्राच्या आईची पूर्णपणे विटंबना होतेय आणि उघडय़ा डोळय़ांनी बघताहेत, त्यामुळे जीव जळतोय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
बाबुल सुप्रियो यांच्या संगीत कार्यक्रमाचा उल्लेख करतानाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी पार्श्वगायक किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्ना डे, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनीही शिवसेनेसाठी कार्यक्रम केले होते याची आठवण सांगितली. त्यावेळी लाईव्ह ऑर्पेस्ट्रा असायचा, हल्ली की-बोर्ड लावतात, व्होटिंगही मशीनवर होते, अशी मिश्कीलीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
दोन्ही निवडणुकांसाठी तयारी करा
1999 मध्ये युती होती. कारगीलचे युद्ध जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुका सहा महिने आधी घेतल्या. पेंद्रात आपले सरकार आले, पण खाली विधानसभेत दांडी उडाली. याही वेळी तसे वातावरण आहे. त्याचा गैरफायदा घेऊन दोन्ही निवडणुका लावल्या जाऊ शकतील. त्याची तयारी करा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या.
मुंबईचा जिव्हाळय़ाचा कार्यक्रम जाहीर करणार
येत्या दोन-तीन दिवसांत मुंबईच्या जिव्हाळय़ाचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. नव्या-जुन्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी यापुढेही अशीच साथसोबत, संगत कायम द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे यासुद्धा उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गीते उपस्थित होते.
पूर्वी म्हण होती. यथा राजा तथा प्रजा… तशी लोकशाहीत म्हण आहे यथा प्रजा तथा राजा. प्रजा ठरवते राजा कोण पाहिजे. तो ठरवण्याचा अधिकार राहतोय की जातोय असे वाटायला लागले तेव्हा शिवसेना लढायला उभी राहिली.
शिवसेनेला संपवायला निघालेल्यांना संपवायचेय
आपल्या स्वाभिमानासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झाला ती शिवसेना संपवायला जे निघाले आहेत त्याला संपवल्याशिवाय रहायचे नाही, हीच जबाबदारी नव्या नेत्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. हे नेतेपद शोभेचे पद नाही. केवळ कुणी कार्यक्रमाला आला म्हणून छातीला बिल्ला लावला असे नाही.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यामध्ये जो स्वाभिमान, अभिमान, जिद्द, आत्मविश्वास भिनवलाय तो पुढच्या पिढीमध्ये नेण्यासाठी आणि टिकवण्यासाठी या नव्या नेत्यांची नेमणूक केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बचेंगे और देश को बचाऐंगे
दत्ताजी शिंदे यांचे वाक्य होते…बचेंगे तो और भी लढेंगे…पण आम्ही बचेंगेही आणि देश को भी बचायेंगे. पदे येतात आणि जातात, पण सोन्यासारखे शिवसैनिक समोर असल्यानंतर मला त्याची पर्वा नाही.
नवनियुक्त नेत्यांचा सन्मान
नवनियुक्त शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कलीना विधानसभा क्षेत्र विभाग क्र. 6 च्या वतीने या सन्मान सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. कलीना मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस, विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर, विभाग संघटक अश्विनी मते यांच्या पुढाकाराने आणि सुप्रिमो फाऊंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.
…हे 2024 चे शुभसंकेत
आज जो चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला तसाच गेल्या वेळीही लागला होता. छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थानात काँग्रेस जिंकली होती. पण संसदेत उलटे झाले. हरलो त्याचे दुःख असेल, पण कदाचित हे 2024 चे शुभसंकेत आहेत. लोक काही इतके मूर्ख नाहीत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

























































