जळगावात शिवसेनेचा भगवा! भाजपचे 27 नगरसवेक फुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगलीत टप्प्यात कार्यक्रम झाल्यानंतर जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवत भाजपला जोरदार झटका दिला. गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फुटले आणि जळगावात शिवसेनेचा महापौर बसला. महापौरपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा दणदणीत पराभव केला. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली.

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून ही निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पीठासीन अधिकाऱयांनी मतदानाची प्रक्रिया सुरू करताच भाजपच्या उरल्यासुरल्या सदस्यांनी शिवसेना उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेत ते रद्द करण्याची मागणी केली. मात्र पीठासीन अधिकाऱयांनी ही मागणी फेटाळून लावली. सत्ता हातातून जात असल्याचे दिसताच भाजपच्या सदस्यांनी निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे यांनी ऑनलाईन सभा बेकायदेशीर असल्याचा कांगावा केला. मात्र पीठासीन अधिकाऱयांनी त्यांचे म्हणणे फेटाळले. त्यानंतर पुन्हा ऑनलाईन मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.   त्यावर भाजपच्या भारती सोनवणे व अॅड. सुचेता हाडा यांनी स्पीकरचा आवाज येत नसल्याची तक्रार केली. केवळ मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी हे उद्योग सुरू असल्याचे लक्षात येताच माजी महापौर  विष्णु भंगाळे यांनी अडथळे आणणाऱयांवर कारवाईची मागणी केली. पीठासीन अधिकाऱयांनी तंबी दिल्यानंतर गोंधळ थांबला आणि मतदान घेण्यात आले. प्रत्येक नगरसेवकाकडून त्यांनी दोन्ही पदांसाठी नेमके कुणाला मत दिले याची खातरजमा करून घेण्यात आली.

भाजपला भगदाड, 31 मते फुटली

मतमोजणी करून पीठासीन अधिकाऱयांनी शिवसेनेच्या जयश्री महाजन या 45 विरुद्ध 30 मतांनी महापौरपदी विजयी झाल्याचे घोषित केले. त्यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी दणदणीत पराभव केला. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे कुलभूषण पाटील हे निवडून आले. त्यांनी भाजपचे सुरेश सोनवणे यांना अस्मान दाखवले. मतमोजणीत भाजपची 27 मते फुटल्याचे स्पष्ट झाले. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेला मत दिले.

शिवसेनेच्या वज्रमुठीला यश

या निवडणुकीत भाजपचे गर्वहरण करायचेच असा वज्रनिर्धार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मदत केली.

भाजपने जे पेरले तेच उगवले;गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

जळगाव महापालिकेवर शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने भगवा फडकला आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आखलेल्या रणनीतीला यश मिळाले असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.  भाजपने जे पेरले तेच उगवले असा हल्लाबोलही त्यांनी केला.

गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह

भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर केलेल्या चाचणीत मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाइन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती महाजन यांनी ट्विट करून दिली आहे.

महाजनांचा गर्विष्ठपणा नडला

जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. गिरीश महाजन यांच्या गर्विष्ठपणाला नगरसेवक वैतागले होते. त्यामुळेच महापालिकेत सत्तांतर झाले अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.   महाजन यांचे इतरांना तुच्छ लेखण्याचे राजकारणच भाजपच्या अवनतीला कारणीभूत असून फक्त 10 दिवसांत आम्ही हा ‘गेम’ केल्याचे खडसे यांनी सांगितले.

अहंकाराचा फुगा फुटला

जळगाव म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. मागच्या निवडणुकीत महाजन यांनी फोडाफोडीचे राजकारण करून भाजपची सत्ता आणली होती. मात्र महाजनांच्या अहंकारी, गर्विष्ठ राजकारणाचा भाजपच्या नगरसेवकांनाच वीट आला होता. त्यामुळे तब्बल 31 नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाजन यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले.