
सामना प्रतिनिधी । कर्जत
कर्जतवासीयांचा भक्कम पाठिंबा शिवसेनेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडणार आणि नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा जबरदस्त निर्धार उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान करून लोकसभा-विधानसभेच्या विजयाचा शुभारंभ कर्जतमधून होईल असेही त्यांनी सांगितले.
कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 27 जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे नगराध्यक्षपदासाठी मिळून एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेकडून सुवर्णा जोशी तर राष्ट्रवादीकडून आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रचाराची व्यूहरचना आखली असून जाहीर सभा, चौक सभा, घरोघरी संपर्क असा प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सुवर्णा जोशी यांनी गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यांना कर्जतमधील समस्यांची जाणीव असून त्या सोडविण्यासाठी जोशी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्या तुलनेत प्रतीक्षा लाड या नवख्या आहेत.
ही निवडणूक कर्जतकरांसाठी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी संपर्कप्रमुख दत्ता दळवी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्यासह सर्वच पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्रचाराचे रान उठवले आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत ‘कांटे की टक्कर’ असल्याने खऱ्या अर्थाने महेंद्र थोरवेविरुद्ध सुरेश लाड अशीच लढत होणार आहे.

































































