
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जगविख्यात उद्योगपती एलन मस्क यांनी खळबळजनक दावा केला आहे. ‘माझी हत्या करण्याचाही प्रयत्न झाला. आठ महिन्यात दोनदा प्राणघातक हल्ला केला गेला. येणारा काळ धोक्याचा आहे,’ अशी पोस्ट एलन मस्क यांनी सोशल मीडियात शेअर केली आहे.
यापूर्वी दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या दोघा हल्लेखोरांना टेक्सासमध्ये टेस्ला मुख्यालयापासून 20 मिनिटांच्या अंतरावर अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे बंदूकही सापडली होती, असे मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराची घटना झाल्यानंतर अमेरिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. यादरम्यान मस्क हे ट्रम्प यांच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभे राहून भूमिका मांडू लागले आहेत. आगामी निवडणुकीत आपण ट्रम्प यांना पाठिंबा देणार असल्याची जाहीर घोषणाही मस्क यांनी केली आहे.
ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेचे अपयश उजेडात आले आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी ही आग्रही मागणी मस्क यांनी केली आहे.