
सामना प्रतिनिधी । लातूर
उदगीर शहरातील मोंढ्यातील दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. रोख रक्कम, सिसिटीव्हीचा डिव्हीआर बॉक्स असा सुमारे १ लाख ४५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाम सुभाषराव वट्टमवार रा. चोबारा रोड उदगीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीचे मोढ्यातील दुकानाच्या बाथरुमची खिडकी तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या काऊंटरमधील रोख रक्कम ३५ हजार रुपये, विदेशी चलनाच्या ४० नोटा, सिसीटीव्हीचा डिव्हीआर बॉक्स चोरण्यात आला. त्याचप्रमाणे बालाजी हालकुंडे यांच्या आडत दुकानातील कपाटाचे लॉकर तोडून १३१५० रुपये तसेच संदीप बिरादार यांच्या कपाटाचे लॉकर तोडून १४ चांदीचे शिक्के, रोख ५ हजार रुपये असा सुमारे १४५१५० रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

































































