स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, नाबाद १०३ वांदरकर गुरुजी आता लघुपटातून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे, रत्नागिरी 

वय वर्ष १०३ असलेले वांदरकर गुरुजी म्हणजे तरुणांना लाजवेल असा उत्साह… स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार…नदीला पूर आलेला असताना पोहत पैलतीरावर जाऊन विद्यादानाचे काम करणारा एक तपस्वी शिक्षक…स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना धडे देणारे वांदरकर गुरुजी यांच्या जीवनावरच्या एक लघुपटाची निर्मिती रत्नागिरीतील तरुण कलाकरांनी केली आहे. या लघुपटामुळे रत्नागिरीतील गेल्या शंभर वर्षातील ऐतिहासिक गोष्टींचा ठेवा पुढील अनेक पिढ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
महादेव नारायण वांदरकर यांचा जन्म १५ जुलै १९१६ रोजी झाला. १९३५ साली ते सातवी पास झाले. ब्रिटिशांची जुलमी राजवट अनुभवलेले वांदरकर गुरुजींनी महात्मा गांधीजींच्या मीठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला. आचार्य विनोबा भावेंच्या भुदान चळवळीत लांजा ते रत्नागिरी दरम्यानच्या पदयात्रेत त्यांनी सहभाग घेतला होता. आचार्य विनोबा भावेंच्या त्या भेटीच्या आठवणी गुरुजींच्या मनात आजही ताज्या आहेत. १९३१ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्ष गुरुजींनी पाहिला. गाडगेबाबा सोबत स्वच्छता मोहिमेत वादंरकर गुरुजी सहभागी झाले आहेत. अशा अनेक गोष्टींना गुरुजी या लघुपटातून उजाळा मिळणार आहे. या लघुपटाचे लेखन रत्नागिरीतील ज्येष्ठ नाटककार विजय साळवी यांनी केले आहे. दिग्दर्शन राहुल भुते आणि ओंकार पंडीत यांचे आहे. साईप्रसाद पिलणकर आणि परेश राजिवले यांनी लघुपटाचे चित्रिकरण केले असून रत्नागिरी तालुका भंडारी संघ आणि रत्नभूमी क्रिएशनने यांचे लघुपट निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. केतन तोडणकर आणि प्रथमेश घुडे यांनी अभिनय केला आहे. संकलनाची जबाबदारी ओंकार पंडीत, राहुल भुते आणि अमोल मयेकर यांनी सांभाळली आहे.