
देशभरात थरकाप उडवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आफताब पूनावाला याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला आहे. पॉलीग्राफ चाचणीनंतर तुरुंगात परत घेऊन जात असताना त्याच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची आज पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. याय चाचणीनंतर पोलीस त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन जात असताना दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर हल्लेखोरांनी तलवारीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. दोन-तीन तरुणांनी हातात तलवार उंचावत पोलीस व्हॅनचा दरवाजा खोलून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.+
हल्लेखोरांनी पोलीस व्हॅनवर तलवारीने वार केले आणि व्हॅनचा दरवाजा उघडला. पण, तेवढ्यात पोलीस तिथे आले आणि त्यांनी पिस्तूल काढली. ‘त्याला बाहेर काढा, आताच मारू’, असे म्हणत हल्लेखोर तलवार फिरवू लागले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पोलिसांनी दोन तरुणांनाही ताब्यात घेतले आहे.
#WATCH | Police van carrying Shradhha murder accused Aftab Poonawalla attacked by at least 2 men carrying swords who claim to be from Hindu Sena, outside FSL office in Delhi pic.twitter.com/Bpx4WCvqXs
— ANI (@ANI) November 28, 2022
दरम्यान, आफताब पूनावाला याला दिल्ली न्यायालयाने 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले आहे. आफताबला तिहारमधील तुरुंग क्रमांक 4 मध्ये एकटय़ालाच ठेवण्यात आले आहे. स्वतंत्र कोठडीत एकच कैदी राहणार असून त्याला या सेलमध्येच ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या उपस्थितीतच आफताबला जेवण दिले जाईल. त्याच्या कक्षाबाहेर 24 तास एक गार्ड तैनात असेल. येथे 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे आरोपींवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे.
वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने अत्यंत थंड डोक्याने तिची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. पुरावा मिटव्यासाठी रोज रात्री तो यातील एक तुकडा जंगलामध्ये फेकत होता. या हत्याकांडाचा सहा महिन्यांनी खुलासा झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या हत्या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने तीन करवतींच्या ब्लेडचा वापर केला होता. हत्येसाठी वापरलेले ब्लेड आणि करवत डीएलएफ गुरुग्राममध्ये आपल्या कार्यालयाजवळ फेकल्याचे आफताबने चौकशीत सांगितले आहे.




























































