श्रीसच्चिदानंदस्वामी श्रीदत्तमहाराज, रावेर

167

>> विवेक दिगंबर वैद्य

रावेर येथील सिद्धसत्पुरुष श्रीदत्तमहाराज अर्थात श्रीसच्चिदानंदस्वामी यांच्या अवतारकार्याचा परिचय करून देणारा हा लेख.

बुऱ्हाणपूर येथील एका ढासळलेल्या किल्ल्यातील लाकूड लिलावामध्ये रास्त किमतीला विकत घेऊन श्रीदत्तमहाराजांनी हे श्रीदत्तमंदिर उभारले. चांदीच्या मुलाम्याचे मुगलकालीन नक्षीदार दरवाजे असलेल्या एका सुंदरशा लाकडी देवघरात श्रीदत्तमूर्तीची स्थापना करण्यात आली. आजही सुस्थितीत असलेल्या या श्रीदत्तमंदिरात वास्तव्य करणाऱ्या श्रीदत्तमहाराजांची कीर्ती आसमंतात सर्वदूर पसरती झाली.

एक गरीब वृद्ध कासारीण स्त्राrला निमिषार्धात काशीविश्वेश्वराचे दर्शन घडवून आणणे, श्रीदत्तमूर्ती घडविणाऱ्या गरीब कासार मंडळींना सुस्थिती प्राप्त करून देणे यांसारख्या अनेक दृश्य व अदृश्य लीला श्रीदत्तमहाराजांकडून आपसूक घडत असल्या तरीही ते स्वतः मात्र प्रसिद्धीपासून अलिप्त होते. आपल्यातील सिद्धीची वाच्यता त्यांनी कधी केली नाही. दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक भक्ताची आपुलकीने चौकशी करणे, त्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेत त्याचे होईल तितके निराकरण करणे, भक्तांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून देत सन्मार्गाकडे वळवणे, गुरुमंत्र देणे या व अशा प्रसंगांतून श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्यावर सोपविणाऱयात आलेले श्रीदत्तप्रभूंचे कार्य अखंड चालू ठेवले.

तांदूळवाडी येथील अनंतराव कुलकर्णी नावाचे ब्राह्मण गृहस्थ कुटुंबासह श्रीदत्तमहाराजांच्या दर्शनार्थ येत असत. एकेदिवशी कुलकर्णी श्रीमहाराजांचे दर्शन घेऊन तिथेच विसावले. त्यांची मुले माधव आणि नारायण जवळच खेळत होती. त्यांचा खेळ पाहतानाच श्रीदत्तमहाराज एकाएकी अनंतरावांना म्हणाले, ‘आपला ज्येष्ठ पुत्र माधव सात्त्विक अंतःकरणाचा आहे. त्याचे हातून पुढे मोठे कार्य होणार आहे. आपण या मुलाला मजकडे सोपवावे.’ कोणत्याही मातापित्यासाठी हा कसोटीचा क्षण ठरला असता, मात्र कुलकर्णी दांपत्य निराळे होते, जगावेगळे होते. त्यांनी केवळ परस्परांकडे पाहिले आणि कसलाही विचार न करता क्षणार्धात लहानग्या माधवाला श्रीमहाराजांच्या चरणांवर घातले.

येथून पुढे माधव कुलकर्णी ही श्रीदत्तमहाराजांची जबाबदारी झाली. माधव विलक्षण भाग्यवान त्याला पोरवयापासून श्रीदत्तमहाराजांसमान सिद्धसत्पुरुषाच्या सहवासाचे परमसौख्य लाभले. श्रीमहाराजांच्या कृपाशीर्वादामुळे माधव अल्पावधीतच साधनोपासनेत प्रावीण्य मिळवता झाला. त्याची नामस्मरणामधील एकाग्रता वाखाणण्याजोगी होती. तो श्रीमहाराजांसाठी त्यांची सावली होऊन सेवाकार्यात राहिला. माधवाचे पोरवय संपून तरुणपण आले तेव्हा श्रीमहाराजांनी स्वतः पुढाकार घेत त्याचे लग्न लावून दिले. ‘आपण ब्रह्मचारी आहोत म्हणून आपल्या शिष्यानेही ब्रह्मचारी राहिले पाहिजे’ हे दूरदृष्टी लाभलेल्या श्रीमहाराजांना मान्य नव्हते. त्यांच्या दर्शनाला रसलपूर खेडय़ातील रत्नपारखी नावाची ब्राह्मण स्त्राr नित्यनेमपूर्वक येत असे. एकेदिवशी तिचा अंतस्थ हेतू जाणून घेत श्रीमहाराज तिला म्हणाले, ‘तुला मुलगी होईल. मात्र तिचे लग्न योग्य समयी माझ्या माधवासोबत करून दे.’ श्रीमहाराजांच्या वचनानुसार तिला कन्यारत्न प्राप्त झाले. पुढे योग्य वय अन् वेळ येताच तिचे लग्न माधवासोबत करण्यात आले.

एकदा श्रीदत्तमहाराज म्हणाले, ‘गोपालजी आ रहे है।’ मात्र त्यांच्या या विधानाचा अर्थ माधवदास यांना उमगला नाही. तोच थोडय़ा वेळात खांडव्याजवळच्या ‘खरगोण’ गावातील रायरीकर महाराज नावाचे भगवत्भक्त सोबत गोपालकृष्णाची रेखीव सुबक अशी काळ्यापाषाणाची मूर्ती घेऊन आले. ही मूर्ती रायरीकरांना दररोज स्वप्नात येऊन, ‘मला रावेर येथे श्रीदत्तमहाराजांकडे सोपव.’ असा घोशा लावत असे. असे अनेक दिवस गेले. पुढे हा प्रकार नित्यनेमाने घडू लागला तेव्हा रायरीकर महाराज मूर्ती घेऊन थेट रावेर येथे निघून आले. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला तेव्हा माधवदास यांना श्रीदत्तमहाराज ‘गोपालजी आ रहे है।’ असे का म्हणत होते त्याचा उलगडा झाला.

पुढे श्रीदत्तमहाराजांनी या गोपालकृष्णाच्या तसेच माधवदासांनी बनवून घेतलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचीही स्थापना देव्हाऱयामध्ये केली. श्रीदत्तजयंती उत्सवातील रथोत्सवामध्ये गोपाळकृष्ण आणि विठ्ठल-रखुमाईदेखील विराजमान होऊ लागले. हा रथोत्सव अल्पावधीतच असा काही प्रसिद्धीस आला की दशदिशा आणि पंचक्रोशीच्याही पलीकडील भक्तगण खास रथोत्सव पाहण्यास ‘रावेर’ येथे येऊ लागले. आजही या उत्सवात श्रीमहाराजांनी खास बनवून घेतलेला रथ, पालखी, दहीहंडी, गोपाळकाला व दारूकाम हे महत्त्वाचे आकर्षण असते.

श्रीदत्तमहाराज विरक्त होते. एकदा ते इंदौर येथे गेले असता तेथील श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांनी श्रीमहाराजांची दर्शनभेट घेतली व त्यांना आपल्या राजवाडय़ात आणून शाही सत्कार केला. मात्र निरिच्छ व निर्लेप वृत्तीच्या श्रीमहाराजांनी त्यांच्यासमोर जमा झालेल्या सर्व वस्तू व धनसंपत्ती तिथल्या गोरगरीबांमध्ये वाटली. श्रीमंत होळकरांनी जेव्हा पाच गावे इनाम देण्याचा विचार व्यक्त केला तेव्हा ‘सब भूमी गोपाल की’ असे म्हणत श्रीदत्तमहाराज तेथून निर्विकारपणे उठून निघते झाले. श्रीमहाराज उपभोगशून्य स्वामी होते. ते संचयात रमले नाही. मंदिरात येणाऱया द्रव्याचा उपयोगही ते अन्नदानासाठी करीत असत. पुढे श्रीमहाराजांनी मंदिराची व्यवस्था माधवदासांकडे सोपवली. अशात एकदा श्रीदत्तमहाराजांमुळे माधवदासांना श्रीदत्तप्रभूंचे मलंग फकीरवेशात साक्षात दर्शन घडले. मठातून निघताना मलंगवेशातील श्रीदत्तप्रभूंनी श्रीमहाराजांना भेटस्वरूप पांढरे निशाण दिले. दरवर्षी दसरा आणि मार्गशीर्ष महिन्यात या पांढऱया निशाणाची पूजा केली जाते.

रावेरप्रमाणेच खांडवा येथील विठ्ठल मंदिरातही श्रीमहाराजांचे वास्तव्य असे. या विठ्ठल मंदिराची जबाबदारी श्रीमहाराजांनी माधवदास यांचे बंधू नारायण तथा नाना यांच्याकडे सोपवली. रावेर येथील श्रीदत्तमंदिराची माधवदासांकडे असलेली जबाबदारी पुढे त्यांचे वंशज केशवदास-भानुदास-श्रीपाद यांच्याकडून आजपावेतो सांभाळण्यात आली आहे.
दरम्यान श्रीदत्तमहाराजांची देहकाया लौकिकतेचे शतक पार करून 108 वर्षांची झाली. प्रकृती हळूहळू क्षीण होऊ लागली. कंपवाताने जेर धरला. आपल्या देह विसर्जनाची वेळ नजीक आल्याचे जाणवताच श्रीदत्तमहाराजांनी संन्यासाश्रम स्वीकारला. ‘श्रीसच्चिदानंदस्वामी’ हे नाव धारण केलेल्या श्रीदत्तमहाराजांनी मुखाने ‘श्रीगुरुदेवदत्त’ असे नाम घेत भाद्रपद वद्य 9, सन 1888 मध्ये देह विसर्जित केला. श्रीदत्तमहाराजांची समाधी उत्तराधिकारी माधवदास यांनी श्रीदत्तमूर्तीच्या चरणांपाशी केली. श्रीदत्तात्रय-जनार्दन-एकनाथ अशा सर्वश्रेष्ठ परंपरेतील श्रीदत्तमहाराज अर्थात श्रीसच्चिदानंदस्वामी यांच्या अध्यात्मिक श्रेष्ठतेची प्रचीती आजही त्यांच्या निस्सीम भक्तांना नित्यनेमाने येत आहे. प्रत्येक सश्रद्ध माणसाने आयुष्यात एकदातरी श्रीदत्तमहाराज स्थापित ‘रावेर’च्या श्रीदत्तमंदिराला भेट द्यायलाच हवी. (उत्तरार्ध)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या