बॅडमिंटनमध्ये मालविका बनसोडला रौप्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेनिसमध्ये महाराष्ट्राची सुवर्णपदकाची एकमेव आशास्थान असलेल्या मालविका बनसोडला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अटीतटीच्या अंतिम लढतीत मालविकाला पराभव पत्करावा लागला.

मालविका बनसोड आणि आकर्षी कश्यप यांच्यातील सुवर्ण पदकाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. मालविका आणि आकर्षी यांच्यात यापूर्वी अनेक अंतिम लढती झालेल्या आहेत. त्यामुळे उभय खेळाडूंना एकमेकांच्या खेळाची जाण होती. अंतिम सामन्यातील पहिला गेम आकर्षी कश्यप हिने 21-8 असा सहज जिंकून आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये मालविकाला अपेक्षित लय सापडू शकली नाही, मात्र दुसऱया गेममध्ये मालविकाने आकर्षीला चांगलेच झुंजवले. 9-9च्या बरोबरीनंतर मालविकाने 3 गुणांची आघाडीदेखील घेतली होती. त्यावेळी मालविका दुसरा गेम जिंकले असे वाटत होते, परंतु आकर्षीने जोरदार पलटवार करीत मालविकावर दबाव वाढवला. त्यात मालविकाकडून काही चुकादेखील झाल्या. आकर्षी कश्यप हिने दुसरा गेम 22-20 असा जिंकून सुवर्णपदक जिंकले. कडवी झुंज देऊन पराभव स्वीकारावा लागलेल्या मालविका बनसोडला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यातील दुसरा गेम प्रेक्षणीय झाला. दोन्ही खेळाडू प्रत्येक गुणांसाठी कसून प्रयत्न करत होते. उत्कृष्ट रॅलीजचा खेळ पाहावयास मिळाला. यात मालविकाचे अनेक फटके नेटमध्ये गेले आणि त्याचा फटका तिला बसला. बॅडमिंटन प्रशिक्षक अक्षय देवलकर, वरुण खानविलकर व संघ व्यवस्थापक महेश वाक्रडकर यांनी मालविकाचे अभिनंदन केले.