ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. कोकणातील हे पहिलेच वैद्यकीय महाविद्यालय होईल. त्याचा फायदा कोकणवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास होईल.

सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे आश्वासन राज्य सरकारने यापूर्वीच दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आज बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव संजय कुमार,  आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात व जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे जाईल व सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. या महाविद्यालयासाठी 25  किमी दूर असलेल्या  झारापच्या पर्यायी जागेचा देखील विचार करण्यात आला होता.