अदलाबदलाचा गोंधळ टाळण्यासाठी मृतदेहावर फोटो, मेटल-प्लॅस्टिकचे टॅग

कोरोना किंवा कोणत्याही आजारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास आता त्याच्या मृतदेहावर फोटो आणि नावासह संपूर्ण माहिती असणारे मेटल-प्लॅस्टिकचे टिकावू टॅग लाकण्यात येणार आहेत. काही वेळा मृतदेहाची अदलाबदल होऊन निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने हा महत्त्कपूर्ण निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या शीव रुग्णालयात अलीकडेच एका मृतदेहाची अदलाबदल झाल्याने मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तर काही दिवसांपूर्वी पालिकेच्या केईएम रुग्णालयातही एका मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार घडला होता. असे प्रकार अनावधानाने घडले असले तरी नातेकाईकांच्या रोषाचा सामना रुग्णालय प्रशासनाला करावा लागतो. शिवाय अनेक आरोप झाल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱया डॉक्टर्स-नर्स, आरोग्य कर्मचाऱयांच्या आत्मविश्वासावर-कार्यक्षमतेवर किपरित परिणाम होत असून पालिका प्रशासनाचीही बदनामी होत आहे. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत यासाठी पालिका महत्त्वपूर्ण उपाययोजना करीत आहेत. सद्यस्थितीत रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहावर माहिती असणारा कागदी टॅग लावला जातो. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येतो. यानंतर नातेवाईकांना मृतदेह दाखवून ओळख पटवल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाते. मात्र सध्याच्या स्थितीत मृतदेहाची अदलाबद होण्याची शक्यता असल्यामुळे मृतदेहावर फोटो, माहिती असणारा मेटल-प्लॅस्टिकच्या टॅग लावण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

चौकशी समितीच्या अहवालावरही कार्यवाही

शीव रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना घडल्यानंतर पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर डॉ. अविनाश सुपे, डॉ. भारत आणि डॉ. मोहिते यांची त्री-सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 15 दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे. यामध्ये चौकशी समितीकडून संबंधित घटनेस कोण जबाबदार आहे याच्या चौकशीसह अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनाही सुचवल्या जाणार आहेत. चौकशी समितीने आपल्या अहवालात सुचवलेल्या उपाययोजनांनुसारही पालिका कार्यवाही करणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या