
शीव रुग्णालयातील मृतदेहांच्या अदलाबदलीप्रकरणी शवागृहातील दोघा कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन केल्यानंतर आता या प्रकरणी विविध रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली असून ही समिती त्यांचा अहवाल 15 दिवसांत देणार आहे. या अहवालानंतरच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
रस्ते अपघातात जखमी झालेले अंकुश सुरवडे (26) यांना 28 ऑगस्टला शीव रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रविवार, 13 सप्टेंबरला अंकुश यांचे निधन झाले. दरम्यान, हेमंत दिगंबर यांना शनिवार, 12 सप्टेंबरला मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी शीव रुग्णालयामध्ये आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांचे शवविच्छेदन रविवारी सकाळी करण्यात आले. त्यानंतर त्यांची अदलाबदली झाली.





























































