
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने तिच्या चाहत्यांसह पाठिराख्यांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहे. जगभरातील चाहते तिला बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहे. सध्या सोनालीवर अमेरिकेमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना तिने अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
कॅन्सरग्रस्तांचे उपचारादरम्यान केस गळतात त्यामुळे सोनालीने आपला हेअरकट केला आहे. अमेरिकेत उपचार सुरू असतानाही ती सोशल मीडियावरून आपल्या तब्येतीबाबत माहिती देत आहे. नुकताच तिने आपल्या मुलासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तिने आपल्या मुलाला एक विशेष आणि भावूक मेसेज दिला आहे.
फोटोमध्ये सोनालीच्या चेहऱ्यावर मनमोहक हास्य दिसत असून ती आपल्या मुलाच्या मागे उभी आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, ‘१२ वर्ष ११ महिने आणि ८ दिवसांपूर्वी माझा रॉक बहल, माझा राजा जन्माला आला. आम्ही नेहमीच त्याच्यासमोर तथ्य आणि सत्य मांडले आहे. जेव्हा त्याला ही गोष्ट (आईला कॅन्सर झाल्याचे) कळाले तेव्हा त्याने एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखी प्रतिक्रिया दिली. त्याची प्रतिक्रिया मला उर्जा देऊन गेली. काही वेळा तर तो माझ्यापेक्षा मोठा बनतो आणि मला सांभाळतो. मी असे करायला हवे, मी तसे करायला हवे असे मला प्रत्येक वेळी सांगतो. माझ्या मते अशा परिस्थितीमध्ये मुलांना सहभागी करून घ्यायला हवे. त्यांच्यासोबत वेळ घालवायला हवा, त्यांचा तो हक्क आहे.’
तसेच तिने पुढे लिहिले आहे की, ‘मी सध्या माझ्या मुलासोबत वेळ घालवत आहे. त्याला सध्या शाळेत सुट्ट्या आहेत. आम्ही दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. त्याचा नटखट अंदाज मला सावरायला मदत करत आहे.’





























































