शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार संपवण्याचा प्रयत्न, सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी, शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.

पवन खेडा म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, गृह मंत्रालय हा अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलीस थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतात. गृह मंत्रालयाने नुकतेच दिल्लीच्या नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली असून, त्यांची पहिली मोठी कारवाई शांततापूर्ण आंदोलनावर कठोर भूमिका घेण्याची ठरत असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

यापूर्वी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात, त्यानंतर माजी सैनिकांच्या आंदोलनात आणि आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात झालेल्या कारवाईचा उल्लेख करत खेडा म्हणाले की, सरकार शांततापूर्ण आंदोलनाकडे लोकशाही हक्क म्हणून नव्हे, तर कायदा-सुव्यवस्थेची समस्या म्हणून पाहत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतच लोकशाही हक्क दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण करणारे सोनम वांगचुक यांची उपोषणाच्या 21 व्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली.

दीर्घकाळ उपोषण आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे वांगचुक खूप अशक्त झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना सातत्याने वैद्यकीय देखरेख आणि उपचारांची गरज आहे.

कारवाई शांततेत झाल्याचा पोलिसांचा दावा

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना काही आंदोलकांनी कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, संपूर्ण कारवाई अत्यंत संयमाने पार पाडण्यात आली असून, आंदोलकांना जंतर-मंतर परिसर शांततेत रिकामा करण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अभिजीत दीपके यांचे आरोप, बेमुदत उपोषणाची घोषणा

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पोलिसांनी आपल्याशी मारहाण केल्याचा आणि काही काळ ताब्यात ठेवल्याचा आरोप केला. तसेच देशभरात आंदोलन उभारण्याचे आवाहन करत त्यांनी स्वतःही बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली.