भरधाव ट्रकने सात गाड्यांना चिरडले; उल्हासनगरात थरकाप उडवणारी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उल्हासनगर शहरात भरधाव वेगाने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. आज पहाटे थरकाप उडवणारी घटना समोर आली. नेताजी चौक परिसरात भरधाव ट्रकने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सात गाड्यांना चिरडले. ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रभाग समिती क्रमांक ४ समोरील नेताजी चौक परिसरात हा अपघात घडला. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकामागोमाग सात वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरातील रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी रस्त्यावर कुणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा हा अपघात अधिक भीषण ठरला असता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये थरारक अपघात कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी फरार ट्रक व चालकाचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.