थिसारा परेराची शतकी झुंज, श्रीलंकेचा दुसरा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माऊंट मॉनगनुई

थिसारा परेरा नावाचं वादळ शनिवारी माऊंट मॉनगनुई येथे घोंघावले. त्याने अवघ्या 74 चेंडूंत 13 सणसणीत षटकारांसह आठ चौकारांची आतषबाजी करताना 140 धावांची जबरदस्त खेळी साकारली. मात्र तरीही श्रीलंकेला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे 7 बाद 128 अशा बिकट परिस्थितीतून डाव सावरणार्‍या थिसारा परेराची खेळी व्यर्थ ठरली. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. थिसारा परेराचीच ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या 320 धावांचा पाठलाग करणार्‍या श्रीलंकेची अवस्था 27 व्या षटकांत 7 बाद 128 धावा अशी झाली होती. दनुष्का गुणथिलका याने 71 धावांची खेळी करीत थोडीफार झुंज दिली. मॅट हेन्री (52 धावा देत 2 बळी) व इश सोधी (55 धावा देत 3 बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.  

एकटा लढला

थिसारा परेरा याने श्रीलंकेला संकटातूनच बाहेर काढले नाही, तर विजयाचे स्वप्नही दाखवले. यादरम्यान झेलही सोडण्यात आले. त्याने कर्णधार लसिथ मलिंगाच्या (17 धावा) साथीने आठव्या विकेटसाठी 75 धावांची, लक्ष्मण संदाकनसोबत (6 धावा) 51 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर थिसारा परेरा बाद झाला आणि खेळ खल्लास झाला.  

मुन्रो, टेलर, निशामची अर्धशतके

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कोलीन मुन्रो याने 87, रॉस टेलरने 90 आणि जेम्स निशामने 64 धावांची खेळी केल्यामुळे यजमान किवींना 50 षटकांमध्ये 7 बाद 319 धावा करता आल्या. लसिथ मलिंगाने 45 धावा देत 2 फलंदाज बाद केले.