
सामना प्रतिनिधी । मुंबई
एसटी महामंडळाच्या सेवेतून 1 एप्रिल 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते आज यांनी दिली. राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे 13 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱयांना याचा फायदा होणार असून त्यांना अंदाजे 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येईल.
सह्याद्री राज्य अतिथीगृहावर दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी अशोक फळणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अंदाजे 240 कोटी रुपयांच्या फरकाची रक्कम वितरित करणार
या निर्णयामुळे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे. जून 2016 नंतर आतापर्यंत महामंडळाचे सुमारे 13 हजार कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांना अंदाजे 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यापुढे सेवानिवृत्त होणाऱया कर्मचाऱयांनाही उर्वरित फरकाची रक्कम सेवानिवृत्तीनंतर एकरकमी देण्यात येईल.
तातडीने अंमलबजावणी करा!
जून 2018 मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांसाठी सुमारे 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर झाली होती. होती. या वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 एप्रिल 2016 पासून देण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल 2016 ते जून 2018 या दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱयांना हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आाला होता, पण सेवानिवृत्त कर्मचाऱयांना ही फरकाची रक्कम हप्त्यांमध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी रावते यांनी दिले.

































































