
महाबळेश्वर येथील पर्यटन विभागाच्या माध्यमातून होणाऱया कामांवरील स्थगिती उठवून तातडीने सुरू करावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र दिले आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळास चालना मिळावी, त्याचा अधिक विकास व्हावा म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले होते. परंतु आता त्या कामास स्थगिती देण्यात आली आहे. तसेच पेटीट लायब्ररीचे कामही संथगतीने होत आहे याकडे आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळ हे कोणी एका व्यक्तीच्या फायद्यासाठी नसून ते तिथे जाणाऱया पर्यटकांसाठी आहे, असे पत्रात नमूद करतानाच पर्यटन विकासाच्या रेंगाळलेल्या कामालादेखील चालना द्यावी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.


























































