राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातच ‘आपत्कालीन परिस्थिती’, तांत्रिक अभ्यासाचा अभाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

अपुरे मनुष्यबळ, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तांत्रिक ज्ञान असलेल्या अधिकाऱयांचा अभाव, आपत्तीत मार्गदर्शन करण्यासाठी तांत्रिक पद निर्माणच केलेले नसल्याने राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातच आपत्कालीन परिस्थती निर्माण झाली आहे. खारघरमधील दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्य सरकारला दिले आहेत. पण तांत्रिक माहितीअभावी खारघर दुर्घटनेचा अहवाल केंद्राला पाठवण्यात राज्याचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग अपयशी ठरत आहे.

राज्यावर कोणत्याही प्रकारची मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्याचा सामना करण्यासाठी राज्याच्या आपत्ती विभागाकडे पाहिले जाते; पण कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा तांत्रिकदृष्टय़ा अभ्यास करण्यासाठी एकही पद या विभागात अस्तित्वातच नाही. उष्णतेची लाट असो वा पुराचा धोका अशा प्रकारच्या कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी कोणतेही तांत्रिक पद राज्याच्या आपत्कालीन विभागाकडे नाही.

केवळ आकडेवारीची नोंद

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा एक कर्मचारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतो. हे सर्व कंत्राटी कर्मचारी आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये मृतांच्या आकडय़ांची नोंद करण्याचे काम हे कर्मचारी करतात. पूर, दरडी कोसळण्याची शक्यता, धरणाचे पाणी सोडावे लागल्यास निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याचे ज्ञान असणाऱया मनुष्यबळाची मोठी कमतरता विभागात आहे. केरळ, ओडिशासारख्या छोटय़ा राज्याकडेदेखील स्वतंत्र आपत्कालीन प्राधिकरण आहे. राज्याचा आपत्कालीन विभाग हा मार्गदर्शनासाठी संपूर्णपणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावरच अवलंबून असून त्यांच्याकडून आलेल्या धोक्याच्या इशाऱयाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचवणे इतकेच त्यांचे काम आहे.