आरोपींचे जामिनाचे हमीदार बोगस; हायकोर्टात राज्य शासनाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही आरोपींचे जामिनाचे हमीदार बोगस असल्याचा धक्कादायक दावा राज्य शासनाने उच्च न्यायालयात केला आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने ३१ हमीदारांनी ओळखपत्रासाठी सादर केलेली कागदपत्रे पोलिसांना देण्याचे आदेश प्राधिकरणाला दिले आहेत.

नवी मुंबई, सीबीडी पोलिसांनी राज्य शासनामार्फत ही याचिका दाखल केली आहे. एकच व्यक्ती अनेक आरोपींच्या जामिनासाठी हमीदार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चौकशीत ३१ हमीदारांची कागदपत्रे बोगस व बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ३१ जणांनी ओळखपत्रासाठी दिलेली कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती प्राधिकरणाकडे करण्यात आली. न्यायालयाने आदेश दिल्यास ही माहिती दिली जाईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. त्यावरून न्यायालयानेच हे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली.