
सामना प्रतिनिधी । मुंबई
फांद्यांच्या छाटणीच्या नावाखाली प्रशासनाची आणि उद्यान विभागाची जी काही मनमानी सुरू आहे त्यामुळे एका बाजूला झाडांची बेसुमार कत्तल होत आहे आणि झाडे पडून हकनाक बळी जात आहेत. आतापर्यंत झाडे पडून पाच जणांचा बळी गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. झाडांच्या छाटणीवरून प्रशासनाचा जो मनमानी कारभार सुरू आहे त्याचा आज स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. प्रशासनाचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्यात आली.
हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी वॉर्डावॉर्डांमध्ये झाडांची छाटणी करण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत, मात्र त्यांच्या नेमणुका कशा केल्या जातात, त्यांना कामे कशी दिली जातात, त्यांना मानधन कसे दिले जाते याची माहिती स्थायी समितीला द्यावी अशी मागणी केली. पानांचा कचरा तसाच कुजवत ठेवल्याप्रकरणी आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली याची माहिती देण्याचीही मागणाही त्यांनी केली. छाटणी केल्यानंतर कंत्राटदार लाकडे विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान,झाडांच्या छाटणीसाठी हजारो रुपये ठेकेदार आकारतात. एवढी रक्कम सर्वसामान्यांनी कशी द्यायची, असा सवाल राजुल पटेल आणि मंगेश सातमकर यांनी विचारला.
कोरगावकर यांच्या या मुद्दय़ाला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. विभागातील एखाद्या धोकादायक झाडाची छाटणी करण्यासाठी नगरसेवकांनी बोलावले की कंत्राटदार उडवाउडवीची उत्तरे देतात असे सभागृह नेत्या विशाखा राऊत म्हणाल्या.
-झाडांच्या छाटणीची कामे कशी दिली जातात याची माहिती समितीला द्यावी तसेच ठेकेदाराला समज द्यावी, अशी मागणी संजय घाडी यांनी केली.
-या पद्धतीने झाडांची कत्तल होत असेल तर मग दरवर्षी पावसाळय़ात वृक्षारोपण करण्याला काहीच अर्थ नाही असा मुद्दा समीक्षा सक्रे यांनी मांडला.
-अनेक ठिकाणी झाडे पोकळ असल्याच्या तक्रारी करूनही ती छाटण्याची कारवाई केली जात नसल्याची गंभीर बाब सदानंद परब यांनी मांडली.
स्थायी समितीला माहिती सादर करा!
झाडांच्या छाटणीसाठी ठेकेदार नेमताना कोणते निकष लावतात त्याची माहिती स्थायी समितीला द्यावी असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. ठेकेदारांच्या कारभारावर प्रशासनाचा कोणताही वचक नसून ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.




























































