
सामना प्रतिनिधी । सेलू
गेल्या सहा वर्षांपासून सचखंड एक्सप्रेसला सेलू रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यासह मराठवाडा रेल्वे प्रवासी संघांच्या सेलू शाखेने केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. आज सेलूवासियांनी अमृतसरकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसवर पुष्पवृष्टी करून, रेल्वे इंजिनला सजवून, पेढे वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल ताशाच्या निनादात स्वागत केले.
यावेळी परभणीहून सेलूपर्यंत प्रवास करणारे खासदार संजय जाधव, रेल्वेचालक राकेश रंजनकुमार, मोहंमद सलीम, गार्ड के. सी. मीना, स्टेशन मास्तर अंशू कुमार व तिकीट तपासणीसांचा मराठवाडा रेल्वे प्रवासी संघातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. संचखंड एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणारे खासदार संजय जाधव, रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे सचिव प्रवीणकुमार गेडाम, प्रतिभा गेडाम, वामनतात्या बोराडे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, पत्रकार व शहरातील विविध सामाजिक संघटनांचे ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, राम नाना खराबे, प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्य मागण्याही मंजूर होतील : खासदार जाधव
सचखंड एक्सप्रेसला थांबा मिळाला. याचे सर्व श्रेय सेलू येथील मराठवाडा रेल्वे प्रवासी संघालाच आहे. शिवनारायन मालानी व त्यांच्या टीमचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. नगरसोल-नरसापूरलाही थांबा मिळावा, तसेच मराठवाडा एक्सप्रेसला रांजणी थांबा, नांदेड-मुंबई नवीन रेल्वे, तसेच सेलू स्थानकावर मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात, अशीही मागणी आहे. त्याही लवकरच पूर्ण होतील, अशी ग्वाही खासदार जाधव यांनी यावेळी दिली.
पाच तालुक्यातील नागरिकांना लाभ
संचखंड एक्सप्रेसला सेलू थांबा मिळाल्याने सेलूसह पाथरी, मानवत, परतूर, मंठा तालुक्यातील नागरिकांना थेट दिल्लीपर्यंत जाण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी यांनी यावेळी केले.

































































