जिद्दीचे पाय पदवी शिखरावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्‍वर

जन्मानंतर वर्षातच त्याला पोलिओ झाला… यात दोन्ही पाय निकामी झाले… वडीलांनी भंगाराचा धंदा करताना त्याला वाढवला… केवळ आणि केवळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेत त्या अपंग विद्यार्थ्याने आज पदवीधर होण्याचा मान मिळवला आहे. यापुढे स्पर्धा परीक्षांना तोंड देत आपणाला सरकारी नोकरी करायची आहे असं तो जिद्दीने सांगतो.

संगमेश्‍वरातील मोहंमद तकसिम खान या विद्यार्थ्याची ही कहाणी असून आजकाल शिक्षण घेताना संगणक, मोबाईल, बाईक्स यासाठी हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोहंमदने नवा आदर्श ठेवला आहे.

मूळ उत्तरप्रदेशमधील अरंज येथील तकसिम खान हे व्यवसायाच्या निमित्ताने २५ वर्षापूर्वी कोकणात आले. भंगार खरेदी करण्याचा व्यवसाय करणाऱ्या तकसिम यांना १९९६ साली मुलगा झाला. या बातमीने त्यांच्या गावाकडेही आनंदोत्सव साजरा झाला. मात्र हा आनंद केवळ वर्षभरच टिकला. १९९७ साली अचानक एक वर्षाच्या तान्हुल्या मोहंमदला पोलिओ झाला आणि त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. आता रडत राहून आयुष्य सरणार नाही या भावनेने तकसिम यांनी मोहंमद कंबरेपासून वर चांगला आहे, या आशेच्या जोरावर त्याची सर्व ती काळजी घेतली. अन्य मुलांप्रमाणे मोहंमदला त्यांनी पहिलीच्या वर्गात संगमेश्‍वर येथील केंद्रशाळेत दाखल केले. नियमित अभ्यास करीत त्याने चौथी गाठली. त्याला शाळेत नेण्या आणण्यासाठी कधी आई तर कधी वडील जात येत होते.

पाचव्या इयत्तेत दाखल झाल्यावर त्याला तीनचाकी सायकल देण्यात आली. छोट्या भावाच्या मदतीने तो सातवीपर्यंत या शाळेत शिकला. या दरम्यान केंद्रशाळेत मोहंमद संगणक हाताळू लागला व अन्य मुलांच्या साथीने तो बैठे खेळ खेळू लागला. अलौकिक जिद्दीच्या असामान्य मोहंमदला सातवीतून निरोप देताना शाळेतील सर्व शिक्षकांना अश्रु अनावर झाले. दोन्ही पाय पुर्णतः निकामी असतानाही पुढील शिक्षणाची ओढ आणि आगळ्या वेगळ्या जिद्दीचा संदेश घेऊन तो पैसाफंड हायस्कूल संगमेश्‍वर येथे दाखल झाला.

त्याच्या घरापासून ही शाळा अडीच किमीवर आहे. बसमधून उतरल्यावर ओणव्याने पुढे जात वर्गापर्यंत जाणाऱ्या मोहम्मदची जिद्द पाहून सर्व विद्यार्थी अवाक होत. दहावीच्या वर्गात पोहचल्यानंतर त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून या परीक्षेत चक्क ६० टक्के गुण प्राप्त करीत सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवली.

दहावीनंतर शिक्षण न थांबवता त्याने याच शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. अकरावीच वर्ष थोड निवांत असतं म्हणून शांत न राहता मोहम्मदने एम.एस.सी.आय.टी. चा संगणक कोर्स यशस्वीपणे पुर्ण केला. याच कालावधीत त्याने मराठी आणि इंग्रजी टायपिंग परीक्षा दिल्या व त्यातही उत्तम यश मिळवले. बारावीत मात्र त्याने आपली सर्व जिद्द पणाला लावून अभ्यास करत ६० टक्के गुण मिळवले.

दोन्ही पायांना पोलिओ झालेल्या मोहम्मदला धड उभेही राहता येत नाही तरी पण तो क्रिकेट खेळतो. व्यायामासाठी घराजवळील मैदानात तो रोज सायंकाळी मित्रांसमवेत तासभर खेळतो. बारावीनंतर लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयात प्रवेश घेत त्याने पुढचे शिक्षण सुरू ठेवले. आज तो वाणिज्य शाखेचा प्रथम श्रेणीतील पदवीधर झाला आहे. आता स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी सेवेत दाखल होण्याची मोहम्मदची मनिषा आहे. याचबरोबर नोकरी करून आपल्या भावंडांसह अपंग मुलांना शिक्षणासाठी जमेल तेवढी मदत करणार असल्याचेही तो अभिमानाने सांगतो. त्याला पाठबळ देण्यासाठी आपण त्याच्या ७७५६८८७१७२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतो. मोहम्मदकडे असणारी जिद्द त्याला निश्‍चितच यशोशिखरापर्यंत नेईल आणि भविष्यात तो अशा मुलांचा एक उत्तम आदर्श ठरेल यात शंका नाही.