
विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यापीठातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात, मात्र या विद्यार्थ्यांना अनेकदा स्थलांतर प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतात. युवासेना सिनेट सदस्यांनी स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती.
स्थलांतर प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्याने व त्यातील तांत्रिक चुकांमुळे बऱयाच विद्यार्थ्यांना 10 हजारांपर्यंत दंड सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना ऑनलाइन स्थलांतर प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार असून त्यांना घरबसल्या स्थलांतर प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रमाणपत्र 200 रुपये शुल्क आणि 20 रुपये अर्ज शुल्क विद्यापीठात भरल्यानंतर काही दिवसांत विद्यार्थ्यांना मिळते. मात्र अनेकदा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया प्रमाणपत्रांमध्ये विद्यापीठाकडून चुका करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चुका दुरुस्तीसाठी विद्यापीठामध्ये तीन ते चार फेऱया माराव्या लागतात.
विद्यार्थ्यांची गैरसोय थांबणार
मुंबई विद्यापीठाची भौगोलिक व्याप्ती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांपर्यंत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईत यावे लागते. यासाठी किमान दोन ते तीन हजार रुपये खर्च होतो, तसेच वेळेचा अपव्यय होऊन त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी राज्याचे मंत्री, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरपोच स्थलांतर प्रमाणपत्र देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेने शुक्रवारी मंजुरी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती युवासेना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.



























































