दादरमध्ये विद्यार्थ्यांची धरपकड, पोलिसांनी फरफटत व्हॅनमध्ये कोंबले; भ्रष्ट सरकारविरोधात महिलेचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्यायाविरोधात पेटून उठलेल्या आणि न्यायाची मागणी करणाऱ्या तरुणांचा सरकारने जबरदस्त धसका घेतला आहे. सोनम चांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच भाजप सरकारच्या विरोधात दादर चैत्यभूमी येथे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पण सरकारने पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडले. विद्यार्थ्यांची धरपकड करून पोलिसांनी फरफटत त्यांना व्हॅनमध्ये कोंबले. त्यामुळे काही काळ दादरमध्ये तणाव निर्माण झाला.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज दुपारी चैत्यभूमी येथे आंदोलन करण्यात येणार होते. रविवारी शिवतीर्थ येथे शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनात तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचा सरकारने धसका घेतला. सरकारने आज दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. आंदोलनासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींना रस्त्यातूनच उचलून गाडीत भरून नेण्यात आले. जे गनिमीकावा करत
चैत्यभूमीपर्यंत पोहचले त्यांनाही तेथे पोलिसांनी ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांच्या माध्यमातून आज आंदोलनासाठी येणाऱ्या जेन झींचा आवाज दाबण्यात आला.

 

दरम्यान, आज सकाळपासूनच आंदोलनाची हाक देणाऱ्या साम्या कोरडे, शैलेंद्र कांबळे या तरुणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन स्थळी जाऊच दिले नाही. पोलिसी बळाचा वापर करून सरकारने आंदोलन होऊच दिले नाही.

चैत्यभूमी येथे आंदोलनासाठी पती, मुलासह पोहचलेल्या एका महिलेचा भ्रष्ट सरकारविरोधात संताप आज बघायला मिळाला. कुटुंबासह शांतपणे चैत्यभूमीजवळ आलेल्या त्या महिलेला पोलिसांनी घेरले आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आलोय अशी दिशाभूल करत पोलिसांनी तिला तेथून हटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांची चाल बरोबर हेरून महिला अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडली.

 

शांतपणे उभे राहिलोय तरी हटवताय. ही कसली अभिव्यक्ती, असा सवाल करत महिलेने पोलिसांना खडेबोल सुनावले. आम्हाला तुमचे संरक्षण नकोय, आम्हाला मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासून संरक्षण हवयं. आम्हाला या भ्रष्ट सरकारपासून संरक्षण हवंय असा आक्रोश महिलेने केला. पण पोलिसांनी शांततेत उभ्या असलेल्या त्या महिलेसह तिचा पती व मुलाला उचलून नेले. यावेळी घाबरलेल्या मुलाने पापा… पापा… असा टाहो फोडला.