मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे , सुभाष देसाई यांची केंद्राकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याप्रकरणी केंद्र सरकारने विलंब करू नये, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी ठोस भूमिका मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडली. त्यावर यामध्ये आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले.

केंद्रशासित प्रदेश दीव येथे पश्चिम भागातील राज्यांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केली. सुभाष देसाई यांच्या या आग्रही मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी मराठीजनांनी राष्ट्रपतींना एक लाखाहून अधिक पत्रेसुद्धा पाठवली आहेत.