अभिप्राय – काल्पनिक थरारक प्रतिशोध!

>> सुधाकर वसईकर

म्मू आणि कश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी राखीव दलाच्या 22 व्या तुकडीवर आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. यात 40 जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. देशाच्या अखंडतेवर घाला घालणारा हा भ्याड हल्ला होता.

आता कोणत्याच देशाला प्रत्यक्ष युद्ध वा अणुयुद्ध परवडणारे नाही. म्हणून गनिमी काव्याने सायबर हल्ला, जैविक हल्ला यांसारखे छुपे युद्ध प्रकार अवलंबिले जातात.

एखाद्या देशाच्या व्यवस्थेला वेठीस धरून निरपराध लोकांचा बळी घेणे यात कसले शौर्य? हे असे कुठवर चालणार आहे? शांतता प्रस्थापित होणार की नाही? दहशतवादी हल्ले होतात तरी कसे? हे हल्ले होऊ नयेत याची गुप्तहेर संघटना कशी खबरदारी घेतात? सामान्य माणसाला यातील जटिलता समजत नसते. म्हणून याचा माग सर्जनशील, संवेदनशील लेखक डॉ. चंद्रशेखर भारती यांनी ‘पुलवामा’ या कादंबरीतून घेतला आहे. दहशतवादावरील ही मराठी साहित्यातील पहिलीच कादंबरी असावी, जी संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलीय.

पुलवामा घटनेचा काल्पनिक तपास हे कादंबरीचे मुख्य कथानक आहे. आत्मघातकी हल्ला झाल्याच्या क्षणापासून कादंबरीला सुरुवात होते. हल्ल्यामागील सूत्रधारांना शोधण्याची कामगिरी रॉ प्रमुख अनिलकुमार चाणाक्ष आणि धडाडीचे अधिकारी आदित्य आणि संजना यांच्या टीमवर सोपवतात. त्याचदरम्यान सायबर गुह्यामधील तज्ञ डॉ. प्रभाकर बर्वे यांच्या मुंबईतील बंगल्यावर हल्ला होतो. माजी सैनिक रत्नाकर गायकवाड आपल्या मित्राला वाचवतो. दोघे मिळून चार हल्लेखोरांना कंठस्नान घालतात आणि गोव्याला पळून जातात. तिथे डॉक्टरांचे अपहरण होते. त्यांचे खरे काम काय याचा उलगडा होतो आणि दहशतवादी त्यांच्या जीवावर का उठलेत याचा खुलासा होतो. त्यांना पाकिस्तान आणि चीन राबवू पाहत असलेल्या ‘सायबर थंडर’चा सुगावा लागलेला असतो.

इकडे अनिश आणि आदित्य हे दहशतवादी कासीम याला जिवंत पकडण्यात यशस्वी होतात. त्याच्याकडून पुलवामा हल्ल्याचे धागेदोरे मिळत जातात आणि दहशवादी कारवायांची साखळी उघड होत जाते. दहशतवाद्याकडून मिळालेल्या दस्तऐवजात नमूद कोडचा अर्थ उलगडत हे ऑपरेशन सुरू होतं. पाकव्याप्त कश्मीरमधील जैविक प्रयोगशाळेचा त्यांना मागमूस लागतो. तिचा शोध घेऊन ते ती उद्ध्वस्त करतात. कथानकाच्या शेवटी झारीतील पाचार्य, देशाचे शत्रू यांचा बीमोड होतो. हा उत्कट बिंदूपर्यंतचा प्रवास अनेक रहस्यांचा उलगडा करणारा आहे.

लेखकाला भौगोलिक, प्रादेशिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची उत्तम जाण, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भान आहे. दहशतवाद्यांची मोडस ऑपरेंडी, कोडिंग-डिकोडिंग पद्धत याचं चित्रण कादंबरीत येतं. दहशतवाद्यांच्या सांकेतिक भाषेचे अर्थ उलगडून, त्याचा छडा लावून, प्रसंगी तपासातील गोपनीयता पाळून घटनेची उकल करीत रॉ अधिकारी आपले मिशन कसे पार पाडतात याची विलक्षण कहाणी या कादंबरीत वाचणे लक्षणीय ठरते.

पुलवामा 

लेखक : डॉ. चंद्रशेखर भारती 

प्रकाशक : संवेदना प्रकाशन

पृष्ठे : 240, मूल्य : 350 रुपये