
सामना ऑनलाईन, मुंबई
अवनी वाघिणीबद्दलचे आमच्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पुन्हा एकदा तोफ डागली. मुनगंटीवार एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी मनेका गांधी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले, मनेका यांनी मुख्यमंत्र्यांना माझा राजीनामा घेण्याचे पत्र पाठवले पण या पत्रात जर त्यांनी मुनगंटीवार यांनी राजीनामा दिला नाही तर मी राजीनामा देईन असे म्हटले असते तर मुख्यमंत्र्यांवर चांगला दबाव आला झाला असता. आता मला मंत्रिमंडळातून नाही काढले तर मनेका यांचा अवमान नाही का होणार, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी केला.
अवनी वाघिणीच्या एन्काऊंटरच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुधीर मुनगंटीवार यांना राज्य मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली आहे. मनेका गांधी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुनगंटीवार दै. ‘सामना’शी बोलत होते.
…तर दबाव तयार झाला असता!
मला मंत्रिमंडळातून काढण्यासाठी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या पत्रात मनेका गांधी यांनी एक वाक्य टाकायचे होते की, ‘जर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून काढले नाही तर मी देशाच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देते’ असे त्यांनी पत्रात नमूद करायला हवे होते. त्यामुळे चांगला दबाव आला असता. उद्या मला राज्य मंत्रिमंडळातून क़ाढ़ले नाही तर कारण नसताना मनेका गांधी यांचा अवमान होईल असे मुनगंटीवार म्हणाले.
मुळात अशी जबाबदारी घेण्याची पद्धत आहे का हे मनेका गांधी यांना विचारा. वाघिणीच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी जशी माझ्यावर येते तशी देशातील बालमृत्यूची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर येते. त्या आमच्या नेत्या आहेत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकत कुपोषणावर राजीनामा द्यावा. मी वाघिणीच्या मृत्यूबद्दल राजीनामा देतो, असे थेट आव्हान मुनगंटीवार यांनी दिले.
बछडे नरभक्षक होण्याची भीती
अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. तिच्यासोबत असलेल्या दोन्ही बछडय़ांनीही माणसांचे मांस खाल्ल्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बछडे नरभक्षक होण्याची भीती शार्पशूटर नवाब शफावत अली यांनी व्यक्त केली आहे.






























































