
शिवसेनेच्या आंदोलनामुळे उसाला प्रति टन 2200 ते 2500 पर्यंत भाव देण्यासह 2200 रुपयांचा पहिला हप्ता आणि ‘एफआरपी’प्रमाणे 2500 प्रमाणे भाव देण्याचे तडवळ साखर कारखाना, अक्क्लकोट, सोलापूर प्रशासनाने मान्य केले आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्यामुळे उसाची भाववाढ आणि प्रलंबित मागण्या मान्य झाल्यामुळे परिसरातील शेकडो शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱयांच्या हितासाठी उसाला भाववाढ आणि इतर मागण्यांसाठी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुवरे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. याला शेतकऱयांनी मोठा पाठिंबा दिला. अखेर या आंदोलनाची दखल घेत कारखाना प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्यात आल्या. यामध्ये वजनकाटा सीसीटीव्ही कॅमेराच्या कक्षेत माप देण्यासह इतर मागण्याही मान्य करण्यात आल्या. दरम्यान, आनंद बुक्कानरे यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, शहर संपर्कप्रमुख अतुल भवंर, संतोष केंगनाळकर, राजू बिराजदार, शरण सुरवसे, सोपान निक्ते, मल्लिनाथ खुब्बा, स्वीमीराव मोरे आदी उपस्थित होते.


























































