पानगाव येथून ऊस तोड मजुराचे अपहरण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल कारखान्याजवळील रस्त्यावरून ऊस तोडीचे काम करणाऱ्या मजुराचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील दोघांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गंगाबाई तुकाराम इंगळे (रा. बोरगव्हाण ता. पाथरी) यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी ही नवरा तुकाराम दत्तात्रय इंगळे यांच्यासोबत मागील चार महिन्यापासून टायरगाडीसह पन्नगेश्वर शुगर मिल येथे ऊसतोडीचे काम करीत आहे. नवरा तुकाराम याने पाथरी येथील संतोष जोगदंड याच्यासोबत बँक कर्जासाठी व्यवहार केलेला होता. पैसे परत देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद सुरू होता.

8 मार्च 2019 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या फडावरून गाडी घेऊन कारखान्याकडे जात होते. तेव्हा कारखान्याच्या जवळील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रस्त्यावर अचानक एका काळ्या रंगाच्या कारमधून संतोष जोगदंड, दीपक कठारे हे खाली उतरले आणि त्यांनी तुकाराम यास ऊसाच्या गाडीवरून खाली उतरण्यास सांगितले. खाली उतरल्यानंतर जबरदस्तीने कारमध्ये घालून भरधाव वेगात निघून गेले. या प्रकरणी पोलीसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.