
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
शिरूर तालुक्यातील पश्चिम भाग सातत्याने दुष्काळी भाग म्हणून गणला जायचा. त्यामध्ये पाबळ, खैरेनगर, कान्हूर, मोराची चिंचोली, सविंदणे, मलठण, कवठे येमाई, इतरही बरीच गावे, वाड्या-वस्त्यांचा समावेश होता. पण या भागातून वाहणारी घोडनदी व त्यावर झालेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यातून काही गावांची दुष्काळातून सुटका झाली. यातून काही बारमाही बागायती गावे झाली. पण पठारावरील गावे, वाड्या, वस्त्यांवर यावर्षी भयाण दुष्काळी छाया आहे. ही १० ते १२ गावे दुष्काळाच्या तीव्र छायेत आहेत. पावसाळा सुरु व्हायला किमान ८ -९ महिने जायचे आहेत. या गावांना नेहमीच मार्च, एप्रिल व मे महीन्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या वर्षी पाच महीने आधीच पाणी टंचाई जाणवू लागली आहेत. खरा उन्हाळा तर पुढेच आहे.
खैरेनगर, खैरवाडी, लाखेवाडी, मिडगुलवाडी परिसरात सहज फेरफटका मारला तरी पाण्यावाचून जळालेले शेतीमाल त्याची साक्ष देताना दिसत आहेत. कुकडीनदीला असणाऱ्या अल्प पाण्याच्या व विहिरीवर पाण्याचा तुटवडा पडण्याआधी लवकर कांदा पीक घ्यावे या हेतूने शिरूर तालुक्यातील माळवाडीचे शेतकरी जयवंतराव भाकरे यांनी नुकतीच तालुक्यातील दुष्काळी भागातील खैरेवाडी येथे शेतकरी शांताराम विष्णू खैरे यांच्याकडे कांदा रोपांविषयी चौकशी केली असता कांद्याची रोपे भरपूर आहेत पण पाण्याअभावी जळून चालली आहेत, नाईलाजाने येथील शेतकरी ही जीवापाड मेहनत घेऊन तयार केलेली कांदा रोपे केवळ पाण्या अभावी जाळून जाण्याच्या मार्गावर असल्याने फुकट देत आहेत. घेऊन जा, असा निरोप भाकरे यांना दिला.
जयवंतराव भाकरे आपल्या काही शेतकरी मित्रांसमवेत रोप पाहण्यासाठी खैरेवाडी येथे गेले असता तेथील परिस्थिती त्यांना फारच विदारक पाहावयास मिळाली. बहुतेक शेतकऱ्याची कांदा रोपे जळून गेली होती. आणी ज्यांच्याकडे होती ते वाटेल त्या किंमतीला द्यायला तयार होते. खरेच शेतकऱ्यांसारखा उदार कोणीच नसेल संकटातही तेथील शेतकऱ्यांची उदारता त्यांना दिसून आली.
ज्वारीची पिके फुटभर असतानाच करपली होती. पिक एक वेळ गेलेले शेतकरी सहन करेलही पण मागील दोन वर्षांपासून या भागात दुष्काळाची थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. पिण्यासाठी पाणी जेमतेम उपलब्ध होते. अजून बरेच दिवस जायचे आहेत. जनावरांना हिरवा चाराच उपलब्ध नाही. वाळलेल्या वैरणीवर जनावरांची गुजराण चालू आहे. महिन्यात पाणी संपेल मग काय करायचे? हा मोठा प्रश्न आ वासून त्यांच्यापुढे उभा आहे. बागायत क्षेत्रातून चालू असलेल्या उसतोडीची वाढे व्यवसाईक या भागात आणातात, पण त्याचे दर इतके जास्त आहेत की, जनावरे जगविण्यासाठी नाईलाजानेच येथील शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहेत.
शेतीविषयक प्रश्नांची पूर्ण माहिती व शेती करतानाच्या व्यथा ज्ञात असलेल्या जयवंतराव भाकरे खैरेवाडी येथील शेतकऱ्यांची पाण्यावाचून होत असलेली बिकट अवस्था प्रत्यक्ष पाहिल्या नंतर ते बोलताना म्हणाले की, जेथे पाणी उपलब्ध आहे, अशा जवळच्या ठिकाणी या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आपले आप्तस्वकिय, मित्र किंवा ओळखीचे असे जे असतील त्यांनी आपल्याजवळ निवारा द्या. जेणेकरुन किमान त्यांच्या जनावरांना पाणी मिळेल. ते त्यांच्या पध्दतीने जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करतील. या दुष्काळात किमान त्यांची जनावरे वाचवण्यासाठी मदत करता आली तर जरूर करा, असे आवाहन देखील भाकरे यांनी केले.

































































