बुलढाण्यात लाचखोर तलाठ्यास रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

मृत्यृपत्राद्वारे दिलेली शेतजमीन तक्रारदाराचे नावावर नोंद करुन सातबारा देण्यासाठी पिंपळगाव काळे येथील तलाठी शेख याने १० हजार रुपयांची लाच मागितली व त्यातील ५ हजार रुपये स्वीकारताना त्याला बुलढाणाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकार्‍यांनी आज रंगेहात पकडले.

तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील तक्रारदाराने तक्रारीत म्हटले की, आजी लक्ष्मीबाई चिंधाजी अवचार यांनी पिंपळगाव काळे येथील शेतजमीन मृत्यूपत्राद्वारे दिलेली असून ही शेतजमीन नावावर नोंद करुन त्याचा सातबारा मिळावा म्हणून पिंपळगाव काळे येथील तलाठी शेख यांना मागणी केली होती. त्याबदल्यात तलाठी यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी पहिला टप्पा ५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबतच्या तक्रारीवरुन बुलढाणाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकार्‍यांनी पडताळणी कार्यवाही केली.

अधिकार्‍यांनी रचलेल्या सापळ्यात तलाठी शेख याला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्चना जाधव व त्यांच्या पथकाने केली.