तामिळनाडूमध्ये धरणात पोहायला गेलेल्या 7 मुलींचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील नदीच्या धरणावर पोहायला गेलेल्या सात मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. डॉक्टरांनी तपासणी करून सात जणींना मृत घोषित केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

कुचिपलयमजवळ गेडिलम नदीवर असलेल्या चेक धरणावर सात मुली पोहायला गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यातील दोनजणी खोल पाण्यात बुडत असल्याचे पाहत इतरांनी त्यांची मदत करण्यासाठी आरडओरडा केला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या इतर पाच मुलीही पाण्यात बुडाल्या.

पाण्यात बुडून या सात जणींचा मृत्यू झाला आहे. सुमुथा(16), नवनीता19),प्रिया(19),मोनिका (15), संगीता (17), प्रियदर्शिनी (14) आणि काव्या (12) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने सात जणींचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.