
तामीळनाडू सत्ताधारी द्रमुक आणि राज्यपालांमध्ये संघर्षाचा भडका उडाला. विधानसभेत अभिभाषणावेळी राज्यपाल आर. एन. रवी यांनी महापुरुषांचे आणि तमिळ जनतेची अस्मिता असणाऱया महत्त्वाच्या नेत्यांची नावे वगळली. भाषणात काही संदर्भही गाळले. यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यपालांसमोरच मूळ भाषण नोंदवण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर राष्ट्रगीत होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभात्याग केला.
राज्यपालांच्या भाषणावर त्यांच्या समक्षच मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी संताप व्यक्त केला. मूळ अभिभाषणाच्या इतिवृत्तांतात समावेश करावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि हा प्रस्ताव मंजूरही झाला.
राज्यपाल आर. एन. रवी यांनी काही दिवसांपूर्वी तामीळनाडूचा उल्लेख ‘तमिळझगम’ असा केला होता. ‘तमिळझगम’ शब्दाला द्रमुकसह त्यांच्या मित्र पक्षांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी तामीळनाडू विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. प्रथेनुसार राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. अभिभाषणासाठी राज्य सरकारकडून राज्यपालांना मसुदा दिला जातो. सरकारकडून दिलेले संदर्भ, सरकारची उपलब्धी याचा अभिभाषणात राज्यपालांनी उल्लेख करणे क्रमप्राप्त असते. परंतु राज्यपाल रवी यांनी या मसुद्यात बदल केले. अनेक महत्त्वाचे संदर्भ वगळले त्यामुळे गोंधळ झाला. द्रमुक आणि सहकारी पक्ष काँग्रेस, एमडीएमकेच्या आमदारांनी ‘तामीळनाडू झिंदाबाद’, ‘ही तमिळांची भूमी आहे’ अशा घोषणा दिल्या. जोरदार घोषणाबाजीत राज्यपालांनी भाषण कसेबसे पूर्ण केले.
राज्यपालांनी भाषणात काय वगळले?
- राज्यपाल रवी यांनी अभिभाषणातील महत्त्वाचा 65वा मुद्दा वगळला. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, समानता, सर्वसमावेशक विकास, महिला सबलीकरण, सर्वांप्रति करुणा या तत्त्वांच्या आधारे या सरकारची स्थापना झाली, असा उल्लेख असलेला भाग वगळला.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रामासामी पेरियार, अण्णादुराई, करुणानिधी या महत्त्वाच्या नेत्यांची नावे मूळ मसुद्यात असतानाही राज्यालांनी वगळली आणि आयत्यावेळी स्वतःचे काही संदर्भ जोडले.
राष्ट्रगीतापूर्वीच राज्यपालांचा सभात्याग
- मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव मंजूर होताच राज्यपालांनी सभात्याग केला. राष्ट्रगीतानंतर कामकाजाचा समारोप होतो. पण त्याआधीच राज्यपाल सभागृहाबाहेर पडले.
‘गेटआऊट रवी’चा ट्विटरवर ट्रेंड
- तामीळनाडूत राज्यपालांचा तीव्र निषेध व्यक्त होत असून, हॅशटॅग ‘गेटआऊट रवी’ हा ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे.



























































