वेबसीरिज – एका सैनिकाच्या जिद्दीची कथा

>> तरंग वैद्य

कारगिल युद्धात जखमी होऊन नंतर पक्षाघाताने आजारी झालेल्या मेजर दीपेंद्रसिंग यांची लढाऊ वृत्ती, जिद्दीने परिस्थितीशी सामना करत जिंकण्याचा प्रवास मांडणारी ही प्रेरणादायक मालिका जीत की जिद.

‘जित की जिद’ ही सात भागांची मालिका झी फाइव्ह ओटीटीवर जानेवारी 2021 मध्ये आली. लष्करी पार्श्वभूमी असलेली ही मालिका अतिशय प्रेरणादायक आहे, त्यामुळे चुकवू नका, असे अगदी सुरुवातीलाच नमूद करतो. ही कथा आधारित आहे कारगिल युद्धात जखमी होऊन नंतर पक्षाघाताने आजारी पडलेल्या मेजर दीपेंद्रसिंग ह्यांच्या लढाऊ वृत्तीची. कसे ते जिद्दीने परिस्थितीशी लढतात आणि जिंकतात ह्याची.

मालिकेची पार्श्वभूमी अर्थातच लष्कराची आहे. एक योद्धा ज्याला आपण कमांडो म्हणतो, तो कसा तयार होतो ह्याची तपशीलवार माहिती इतक्या ताकदीने दाखवली आहे की अंगावर काटा येतो आणि नकळतच ह्या योद्धय़ांसाठी मनात असणारा आदर आणखीन वाढतो. ‘स्पेशल फोर्स कमांडो’चे प्रशिक्षण घेऊन अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होणाऱयांचा टक्का 4 ते 5 एवढाच असतो. थोडक्यात ह्यातून बाहेर पडलेला जगात कुठल्याही आणि कितीही ताकदीच्या वादळाशी झुंज देऊ शकतो.

दीपचा मोठा भाऊ अतिरेकी हल्ल्यात मारला जातो आणि दीप निर्धार करतो की तो सैन्यात जाणार. कश्मीरमध्ये आपली पोस्टिंग मागून घेणार आणि तिथे अतिरेक्यांचा नायनाट करणार. प्रबळ इच्छाशक्ती आणि निर्धाराच्या जोरावर तो अतिशय कठीण परीक्षा पास करतो आणि कारगिल परिसरातील असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडय़ांचा खात्मा करण्याचा जिम्मा त्याला सोपवला जातो. दिलेले काम अतिशय कुशलतेने करीत असताना एका मोहिमेच्या दरम्यान त्याच्या पोटात पाच गोळ्या लागतात. शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सोपस्कारांनंतर एक विदारक सत्य समोर येते ते म्हणजे दीप आता कधीच स्वतच्या पायावर उभा राहू शकणार नाही हे ऐकून त्याच्या पायाखालची (जे आता त्याला साथ देत नाहीयेत) जमीनच सरकते, पण कसा तो आपल्या जिद्दीचे पाय घेऊन आपल्या आयुष्याचे नवीन पर्व सुरू करतो हे त्याचे थोडक्यात कथानक.

“लड़ाई स़िर्फ मैदान में ही नहीं लड़ी जाती!” मालिकेतील हा संवाद आपल्याला बरेच काही शिकवून जातो. सैन्यातून बाहेर पडल्यावर मेजर दीपेंद्र मॅनेजमेन्ट इन्स्टिटय़ूटमध्ये अॅडमिशन घेतो. पुढे मोठय़ा कंपनीत नोकरीलाही लागतो. काही लोक त्याच्या अपंगत्वाकडे सहानुभूतीच्या नजरेने बघतात, तर काही हा आपल्या अपंगत्वाचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी करतोय ह्या नजरेने. ज्यानी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले त्याला असल्या नजरांना आणि विचारांना सामोरे जाणे कुठल्या युद्धापेक्षा कमी नाही. ही त्याची सैन्याबाहेरची लढाई जी त्याला रोज लढावी लागते, पण तो हे युद्ध लढतो ज्यात त्याला त्याच्या पत्नीची- जया आणि प्रशिक्षणादरम्यान त्याचे प्रशिक्षक असलेल्या कर्नल रणजीतची साथ मिळते.

संपूर्ण मालिका अमित साध ह्या गुणी अभिनेत्याच्या खांद्यावर आहे. त्याचे अभिनयासाठी कौतुक तर आहेच, पण कमांडो प्रशिक्षणासाठी त्याने घेतलेली शारीरिक मेहनत बघितल्यावर त्याला उठून ‘सॅल्यूट’ करावासा वाटतो. तो खडतर अभ्यास, प्रशिक्षकाची कडक बोलणी मनाला लावून न घेता तो ज्या जिद्दीने पुढे जातो तेव्हा असे वाटू लागते की, हा एक खरा प्रशिक्षित सैनिकच आहे. अमृता पुरीने दीपच्या बायकोच्या भूमिकेला न्याय दिला आहे. भूमिका सोपी नव्हती. दीपच्या आजारपणात त्याला साथ देणे, त्याच्या पुढच्या प्रवासात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, तो चिडला की त्याला सांभाळून घेणे, हतबल झाला की त्याला प्रोत्साहित करणे हे सर्व तिने सहजतेने पार पाडले आहे.

विशेष कौतुक सुशांत सिंग ह्या अभिनेत्याचे. मेजर दीपेंद्रचा कडक प्रशिक्षक आणि कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत त्याने जीव ओतला आहे. प्रसंगी त्याच्या अनुशासनाची आणि कडक शिस्तीची चीड येते इतका खरा त्याचा अभिनय आहे. एका सैनिकाचे आयुष्य बघताना जाणवते की, हे सामान्य जीवन जगतानाही सतत देशाचा विचार करत असतात. कारगिल युद्ध आणि इतर मोहिमा अशा पद्धतीने चित्रित केल्या आहेत की त्या परिणामकारक वाटतात. पायांची शक्ती गेली असली तरी इच्छाशक्तीचे पाय लावून आपण लक्ष्य गाठू शकतो, फक्त जिद्द पाहिजे हे सांगत देशभक्तीची भावना जागवणारी एका सैनिकाच्या जिद्दीची कहाणी अवश्य बघून प्रेरणा घ्यावी असे मला वाटते.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)

[email protected]