अनोखी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा; गोपीनाथ सावकार-अनंत काणेंच्या नावाने सांघिक पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रिया प्रॉडक्शनच्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी 5 ते 7 जानेवारी रोजी कुर्ला-नेहरूनगर येथील प्रबोधन प्रयोग घर आणि अंतिम फेरी 12 जानेवारी रोजी शिवाजी मंदिर येथे होणार आहे. यंदा नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार आणि ज्येष्ठ नाटय़निर्माते अनंत काणे यांच्या नावाने सांघिक पुरस्कार दिले जाणार आहेत.

श्री शिवाजी स्मारक मंडळ आणि व्हिजन यांच्या सहकार्याने बोलीभाषा एकांकिका स्पर्धा 2016 पासून सुरू झाली. महाराष्ट्रातील सुमारे 16 बोलींतील 249 एकांकिका आजवर या स्पर्धेत सादर झाल्या आहेत. ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही कल्पना प्रसिद्ध नाटय़निर्माते गोविंद चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्पर्धेच्या स्वरूपात अमलात आणली. मालवणी, सातारी, कोल्हापुरी, संगमेश्वरी, आगरी, खान्देशी, अहिराणी अशा अनेक बोलींतील एकांकिका या स्पर्धेत सहभागी झाल्या.

वेगवेगळ्या बोलींतील सहभागी एकांकिका, नामवंत परीक्षक, आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि अजित भगत, चेतन दातार, रघुवीर तळाशीलकर, विनय आपटे, सतीश तारे, आशालता वाबगांवकर, कुलदीप पवार, संगीतकार राजू पोतदार, रंगमहर्षी कृष्णा बोरकर, प्रकाशयोजनाकार उमेश मुळीक अशा दिग्गज रंगकर्मींच्या नावाने ज्येष्ठ रंगकर्मींनीच पुरस्कृत केलेली रोख रकमेची वैयक्तिक पारितोषिके ही या स्पर्धेची वैशिष्टय़े राहिलेली आहेत. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या नावाने दिला जाणारा सांघिक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केला आहे.

स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज
www.supriyaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संपर्क- 9930466924