आखातामध्ये तणाव वाढला; इराणने ताब्यात घेतले ब्रिटनचे टँकर

43

सामना ऑनलाईन । तेहरान/लंडन

इराणने ब्रिटनचे तेल टँकर ताब्यात घेतले असून यावर 18 हिंदुस्थानी खलाशांसह 23 जणांचा समावेश आहे. इराणची वाटचाल डेंजरस सुरू आहे. आम्ही शांत बसणार नाही असा इशारा ब्रिटनने दिला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणचे ड्रोन पाडले होते. या घडामोडी पाहता आखातामधील तणाव वाढला आहे.

स्टेना बल्क या स्वीडिश कंपनीचे ऑइल टँकर ब्रिटनकडे आहे. ‘स्टेना इम्पेरो’ असे या ऑइल टँकरचे नाव असून सौदी अरेबियाच्या बंदराच्या दिशेने टँकर जात असताना त्याचा संपर्क तुटला. इराणने होरमुझ बंदरात ब्रिटनचे टँकर ताब्यात घेतले. टँकरवर ब्रिटनचे ध्वज आहेत. इराणच्या रेव्होल्युशनगी गार्डने टँकरला घेरले आहे.

मच्छीमार बोटेला धडकले

ब्रिटनच्या ऑइल टँकरने नियमांचे उल्लंघन करून समुद्री मार्ग बदलला आणि इराणच्या एका मच्छीमार बोटीला धडकले. इराकच्या गार्डने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही ताब्यात घेतले असे  इराणच्या लष्कराचे म्हणणे आहे.

जशास तसे उत्तर : इराण

दोन आठवडय़ांपूर्वी 4 जुलैला ब्रिटनने स्पेनच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर इराणचे ऑइल टँकर जप्त केले होते. तब्बल 2 दशलक्ष बॅरल क्रूड ऑइल यामध्ये होते. अमेरिकेच्या इशाऱ्यावर ब्रिटनने हे कृत्य केले होते. ब्रिटनच्या या कृत्याला आम्ही जशास तसे उत्तर दिले  अशी प्रतिक्रिया इराणच्या गार्डियन कौन्सिलने दिली.

इराणची वाटचाल डेंजरस : ब्रिटन

इराणची वाटचाल धोकादायक मार्गाने सुरू आहे. लवकरात लवकर परिस्थिती बदलली नाही तर दुरगामी परिणाम होतील असा इशारा ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट यांनी दिला. आम्ही लष्करी पर्यायांचा विचार सध्या करीत नाही. राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

हिंदुस्थानींच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

इराणने जप्त केलेल्या ब्रिटनच्या ऑइल टँकरवर कॅप्टनसह 18 हिंदुस्थानी खलाशी आहेत. इतर पाच जणांमध्ये रशिया, फिलिपाईन्स, लॅटवियनचे नागरिक आहेत. हिंदुस्थानींच्या सुखरूप सुटकेसाठी इराण सरकारशी बातचित सुरू आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या