दहशतवाद्यांची खुलेआम धमकी, 56 काश्मिरी पंडितांची यादीच जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
terrorist

जम्मू-कश्मीरातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून, पंडितांनी कश्मीर खोरे सोडावे, नाहीतर टार्गेट किलिंग करू, अशी खुलेआम धमकीच दहशतवाद्यांनी दिली आहे. यासाठी सरकारी कर्मचारी असलेल्या 56 कश्मिरी पंडितांची यादीच वेबसाईटवर दहशतवाद्यांनी टाकली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, सुरक्षेची कुठलीही हमी नसल्यामुळे केंद्र सरकारविरुद्ध कश्मिरी पंडितांकडून संताप व्यक्त होत आहे.

कश्मीर खोऱयात वर्षभरापासून टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या टार्गेट किलिंगमध्ये वर्षभरात 24 कश्मिरी पंडित आणि बिगर कश्मिरी नागरिकांना ठार करण्यात आले. पंतप्रधान पुर्नवसन पॅकेज (पीएमआरपी) अंतर्गत कश्मीर खोऱयात ज्या पंडितांची नियुक्ती झाली त्या सरकारी कर्मचाऱयांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले आहे.

शहर, सरकारी कार्यालयाच्या पत्त्यांसह सोशल मीडियावर यादी व्हायरल

पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या एका गटाने द रेजिस्टेंस फ्रंटने (टीआरएफ) ‘कश्मीर फाइट’ या ब्लॉगवर 56 सरकारी कर्मचारी असलेल्या कश्मिरी पंडितांची यादी पोस्ट केली आहे. हे कश्मिरी पंडित कोणत्या गावात, शहरात, कोणत्या सरकारी कार्यालयात काम करतात याची सविस्तर माहितीच या यादीत लिहिली आहे. धक्कादायक म्हणजे, ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कश्मीर खोरे तत्काळ सोडा, नाहीतर टार्गेट किलिंग करू, अशी धमकीच दहशतवाद्यांनी दिली आहे. पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत कश्मिरी पंडितांसाठी खोऱयात 19 ठिकाणी सहा हजार प्लॉट्स दिले जाणार आहेत. या प्लॉट्सचा स्वीकार करू नका. हे प्लॉट घेणाऱया कश्मिरी पंडितांची नावेही जाहीर करू, असेही दहशतवाद्यांनी म्हटले आहे.