
हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट भयानक असल्याने इंग्लंडने या देशाला रेड लिस्टमध्ये टाकले. मात्र साऊदम्प्टन येथे 18 ते 22 जून दरम्यान हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यान आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. हिंदुस्थानी नागरिकांना इंग्लंडमध्ये येण्यास बंदी घातल्याने या फायनलवर अनिश्चिततेचे ढग जमा झाले, मात्र टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ठरल्याप्रमाणेच होईल, अशी ग्वाही ‘आयसीसी’ने दिली आहे.
इंग्लंडने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला रेड लिस्टमध्ये टाकल्याने 19 एप्रिलपासून हिंदुस्थानी नागरिकांना इंग्लंडमध्ये जाण्यास बंदी आहे. इंग्लंडचा नागरिक हिंदुस्थानात असल्यास त्याला मायदेशात आल्यावर दहा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. हिंदुस्थानातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे इंग्लंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल घेण्यासाठी इंग्लंडशी चर्चा करू, असे ‘आयसीसी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयसीसी आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी) याबाबत चर्चा करत असून आम्ही इंग्लंड सरकारकडून या अंतिम कसोटी सामन्यासाठी परवानगी मिळवू, असा विश्वास ‘आयसीसी’च्या प्रवक्त्याने व्यक्त केला.
‘बीसीसीआय’च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडने जरी हिंदुस्थानला रेड लिस्टमध्ये टाकले असले तरी हिंदुस्थानी क्रिकेट संघ जूनमध्ये लवकरच इंग्लंडमध्ये जाणार असल्याने फारशी अडचण येणार नाही. त्यांच्या नियमानुसार आम्हाला दहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल. ‘आयसीसी’ व ‘ईसीबी’ यावर नक्कीच तोडगा काढतील, असेही ‘बीसीसीआय’च्या प्रवक्त्याने सांगितले.




























































