कश्मीरात ‘जैश-ए-मोहम्मद’च्या चार दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, श्रीनगर

दक्षिण कश्मीरातील पुलवामा जिह्यात आज सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
पुलवामा जिह्यातील हानजन परिसरात दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलाचे जवान शोधमोहीम राबवीत असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी उडालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे मुझमील अहमद दार, वसीम अक्रम वाणी आणि मुझमील नाझीर भट अशी असून हे सर्व जण पुलवामा येथील आहेत.

चकमक स्थळी सापडलेल्या साहित्यावरून चौथा दहशतवादी पकिस्तानचा असावा, असे दिसून येते. मृत दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित हेते. सुरक्षा दलांवरील तसेच नागरिकांवरील हल्ल्याच्या अनेक घटनांचे पोलिसांनी त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंदविले होते. चकमक स्थळावरून रायफलसह अनेक शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

हल्ल्याचा कट उधळला; कथुआ जिह्यात शस्त्र जप्त
जम्मू – जम्मू आणि कश्मीरातील कथुआ जिह्यात लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून बिल्लावर ब्लॉक येथे मोठा शस्त्र्ासाठा जप्त केला. यामुळे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेल्याचे लष्कराने शनिवारी सांगितले. जम्मू प्रदेशात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचराकडून मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. गावातील एका निर्मनुष्य परिसरात प्लॅस्टिक बॅगेत लपवून ठेवलेली शस्त्र आणि दारुगोळा या वेळी जप्त करण्यात आला. त्यात दोन एके असॉल्ट रायफल्स, एक हँडग्रेनेड, चार मॅगझिन्ससह 256 काडतुसे आणि स्निपर रायफल्सच्या 59 गोळ्या जप्त करण्यात आल्या.