
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देत मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणे ही दुर्देवी घटना आहे. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही, हे महत्वाचं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे सोमवारी कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी चव्हाण यांनी मंगळवारी पहाटे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत आदी उपस्थित होते.
काल झालेली घटना ही दुर्दैवी आहे. दोन किलोमीटरचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाची असणारी तीन तज्ज्ञांची समिती याची तपासणी करुन अहवाल देईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने गर्डर काढणे महत्वाचे आहे. मुंबई गोवा महामार्ग जलद गतीने व्हायला हवा, ही प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत सुरक्षित हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? त्याबाबत शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

























































