
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा सोमवारी विधीवत संपन्न झाली. यावेळी पवित्र स्नान, अभिषेक, शृंगार व विविध सुवर्ण तसेच रत्नजडित अलंकारांनी श्रींची आकर्षक सजावट करण्यात आली.
श्री विठ्ठलाची व रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली.
पुजेच्या सुरूवातीला प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते श्रींना पहिले स्नान घालण्यात आले. त्यानंतर सुवर्ण तसेच रत्नजडित अलंकारांनी श्रींची आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, विभागप्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहाय्यक विभागप्रमुख संदीप कुलकर्णी, पांडुरंग दशपुत्रे उपस्थित होते. प्रक्षाळ पूजेनंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस काकडा आरती, नित्यपूजा, पोशाख, महानैवेद्य, धूपारती व शेजारती आदी सर्व राजोपचार पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात आले.



























































