
सामना प्रतिनिधी । जामखेड
नवनिर्मितीसाठी जे नेहमी प्रयत्नशिल असतात तेच यशाच्या शिखरावर जातात. यातूनच समाजात नाविन्यपूर्ण समाजनिर्मिती घडते. यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षकच सर्व समाजाला एकत्र करून समाजोपयोगी उपक्रम राबवू शकतात. असे शिक्षणसह संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनंता खेत्रे यांच्या सेवापुर्ती कार्यक्रम डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात पार पडला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव परदेशी आयपीएस संभाजीनगर, मोरेश्वर देशमुख, अरूण चिंतामणी, बबन कुलकर्णी, राजेश मोरे, सुनिल पंडित, पोपटराव काळे, बाळासाहेब साळुंके, दशरथ कोपनर, श्रीराम मुरुमकर, मधुकर राळेभात, राजेंद्र मुळे, दत्तात्रय काळे, जुल्फीकार पठाण, सुभाष घुले, शिवानंद हलकुडे, सुंदरदास बिरंगळ, पोपट जरे, माधुरी देशमुख, शोभा खेत्रे, पवन राळेभात सह अनेक शिक्षक, मुख्याध्यापक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना टेमकर म्हणाले की, शिक्षकाची खरी संपत्ती ही त्यांचे विद्यार्थी आसतात. खेत्रे यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू, अधिकारी, आदर्श राजकारणी घडविले त्यामुळे ते आदर्श आहेत. कागदोपत्री जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जामखेडच्या शैक्षणिक विकासासाठी करावा.
वसंतराव परदेशी बोलताना म्हणाले की, कोणी कितीही मोठा झाला तरी तो शिक्षकाचे ऋण फेडू शकत नाही. खेत्रे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. पोपट काळे यांनी शाळा व्यवस्थापनाचा आदर्श नमुना म्हणून खेत्रे सरांकडे पाहता येईल असे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना उद्धव देशमुख म्हणाले की, सध्या शिक्षकाला घाबरण्याचे दिवस राहिले नाहीत तर अनेक ठिकाणी विद्यार्थीच शिक्षकाला घाबरवतात. दहशत निर्माण करतात. शिक्षकाच्या चांगल्या कामासाठी संस्था नेहमी शिक्षकाच्या पाठिशी उभी राहिल असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अनंता खेत्रे म्हणाले की, मी जे कामे करू शकलो ती सर्वाच्या सहकार्याने करू शकलो आहे. संस्थेने साथ दिली. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास समोर ठेवून भव्य दिव्य असे सभागृह व डिजिटल क्लास रूम निर्माण करू शकलो.




























































