मनासारखा ड्रेस शिवला नाही, टेलरची केली धुलाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक मुलगी शिवायला दिलेला ड्रेस दुकानातून आणायला गेली होती. ड्रेस घालून पाहिला, तर तो तिला व्यवस्थित होत नव्हता. यामुळे तिने दुकानातील टेलरकडे तक्रार केली. तिचे दुकानदारासोबत कडाक्याचे भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की, तरुणी तिच्या नातेवाईकांना घरातून बोलावले. त्यानंतर दुकानाबाहेरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली.

जोधपूरमधील सरदापुरा पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सरदारपुरा बी रोडजवळील मन्नत सलेक्शन येथे 26 रोजी सायंकाळी एक तरुणी नवीन ड्रेस खरेदी करण्यासाठी गेली होती, मात्र तरुणीला ड्रेस व्यवस्थित न झाल्यामुळे तिचे दुकानातील शिंप्यासोबत वादविवाद झाले. त्यानंतर तरुणीने आपल्या घरातील काही लोकांना बोलवून आणले. त्या लोकांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली. हा वाद दुकानातून रस्त्यावर आला. रस्त्यातही दुकानदार आणि तरुणीचे नातेवाईक एकमेकांवर हल्ले करत होते. यामुळे चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर प्रकरण मिटले. दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तरुणीने दुकान मालक शाहरुख आणि सलमान याच्याविरोधात छेड काढणे आणि मारझोड करणे या आरोपाविरोधात सरदारपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुकानदार शाहरुखनेही तरुणीच्या नातेवाईकांच्या विरोधात दुकानात घुसून मारझोड केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. दुकानदाराने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तरुणीसोबत आलेल्या लोकांनी रस्त्यावरून 50 हजार रुपये लुटले. याप्रकरणी सरदारपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी सोमकरण चरण यांनी सांगितले की, सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही बाजूंच्या तक्रारीनंतर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीचे नातेवाईक आणि दुकानदार यांच्यामध्ये झालेल्या मारामारीमुळे काही लोकं जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून तरुणीसोबत असलेल्या तरुणांनी दुकानात प्रवेश करताच भांडण सुरू केल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये तरुणीही भांडताना दिसत आहे.