हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी चार न्यायाधीशांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

तीन कार्यरत न्यायाधीश, एक निवड झालेले न्यायाधीश, दोन वकील आणि दोन महिला अशा ७ जणांविरुद्ध हुंड्यासाठी त्रास देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दरोडा टाकणे या गुन्ह्यांतर्गत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार महिलेचे वडील काही दिवसांपूर्वीच जिल्हा न्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.

केळापूर जि. यवतमाळ येथे कार्यरत असलेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेख वासीम अक्रम शेख जलाल यांचे लग्न गुलअफशार या महिलेसोबत ११ डिसेंबर २०१६ रोजी झाले होते. लग्नानंतर काही दिवस संसार ठीक चालला पण पुढे सर्व काही बिघडले. शेख वासीम अक्रम यांची पत्नी गुलअफशार यांचे वडील त्यावेळी जिल्हा न्यायाधीश होते. सध्या ते एक महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. गुलअफशार यांचे मूळ घर इतवारा भागात आहे. गुलअफशार आणि शेख वासीम अक्रम यांच्यात बेबनाव झाल्यानंतर हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे गेले.

पती-पत्नीचे भांडण मिटवून सरळ मार्गी जीवन असा प्रयत्न सुरू झाला. पण त्या प्रयत्नाला अपयश आल्यानंतर २१ जून रोजी गुलअफशार यांनी याबाबत तक्रार दिली. त्यात त्यांनी गाडी खरेदी करण्यासाठी ४ लाखांची मागणी व इतर साहित्यांसाठी मिळून ११ लाख ५० हजारांची मागणी हुड्यांपायी केली तसेच माझे लाखो रूपयांचे साहित्य बळजबरीने चोरून नेले असे सांगितले.

यावरून न्या. शेख वासीम अक्रम, त्यांचे भाऊ न्या. शेख अमिर शेख जलाल, त्यांचे न्यायाधीश असलेले भाऊजी जावेद सिद्दीकी आणि न्यायाधीश परीक्षा पास झालेले शेख जुनेद शेख जलाल सोबतच वकील असलेले शेख वासीम यांचे वडील मोहम्मद जलाल शेख कासी, त्यांची आई अफसरी बेगम शेख जलाल आणि वासीम अक्रम यांची बहिण शेख फरानाज शेख जावेद सिद्दीकी या सात जणांनी माझ्यावर अन्याय केल्याचं गुलअफशार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले.

या प्रकरणी इतवारा पोलिसांनी ३ न्यायाधीश, १ न्यायाधीश निवड झालेला व्यक्ती, १ वकील, २ महिला अशा ७ जणांविरुद्ध फौजदारी कट रचून दरोडा टाकणे, हुंड्यासाठी त्रास देणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेली भारतीय दंड विधानाची कलमे ३९५, ४९८, (अ), १२० (ब), ३५४, ५०६, ५०४ आणि ३४ अशी आहेत. इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सांळुके यांना देण्यात आला आहे.