तेजस एक्स्प्रेसच्या धडकेने रेल्वेच्या तीन कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पेण

मुंबईकडे जाणाऱ्या तेजस एक्प्रेसने धडक दिल्याने रेल्वेच्या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यांतील जीते गावाजवळ रविवारी रात्री उशीरा घडली.

पनवेल ते पेण रेल्वे मार्गावर सध्या काम सुरू आहे. जिते येथेही काम सुरु असून त्यासाठी रेल्वेचे काही कंत्राटी कामगार रेल्वे रुळाजवळ काम करण्यासाठी आले आहेत. त्यापैकी काही कामगार रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जिते गावात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून ते परत येत असताना रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसने अशोक बारे (३०), भीमसेन गुलकर(४५) व अजय दांडोडीया (२०) सध्या (रा. जिते रेल्वे स्टेशन, मूळ रा. मध्यप्रदेश) यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, तिघांचाही गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.

या घटनेचे वृत्त समजताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड हे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि तिन्ही मृतदेह पेण येथील शासकीय रुग्णालयात आणले. याप्रकरणी अकस्मात मृत्यु म्हणून दादर सागरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड. कॉ. सोनकर हे करीत आहेत. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.