
बिबटय़ांचे मृगया चिन्ह, दात, सुळे, मिशा यांची बेकायदेशीर विक्री करताना वन खात्याच्या पथकाने तिघांना रंगेहाथ पकडल्याची घटना आज तालुक्यातील चंदनापुरी परिसरात घडली.
श्रीराम यादव सरोदे (वय 34), सुशांत उत्तम भालेराव, सुधीर विजय भालेराव (वय 30, सर्व रा. आनंदवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील सुधीर भालेराव हा पळून जाण्यात यशस्वी झाला.
संगमनेर तालुक्यात बिबटय़ांच्या अवयवाची विक्री होत असल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. शुक्रवारी तालुक्यातील चंदनापुरी येथील आनंदवाडी परिसरात बिबटय़ांचे दात, सुळे, मिशा यांची विक्री होणार असल्याची
माहिती वन खात्याला मिळाली. वन विभागाने यासाठी सापळा रचला होता. या पथकातील कर्मचारी बनावट ग्राहक बनून आनंदवाडी येथे संबंधित आरोपींना भेटले. हे आरोपी या पथकाच्या जाळ्यात अलगद अडकले. यांतील श्रीराम सरोदे आणि सुशांत भालेराव यांना पकडण्यात पथक यशस्वी ठरले, तर सुधीर भालेराव हा पळून गेला. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील आणि जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. ही कारवाई सचिन लोंढे, जुन्नर वन विभाग यांची टीम, रईस मोमिन, संदीप येवले, कुणाल घुले, तन्मय बागल, हारुन सव्यद, विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख, गजानन पवार आदींच्या पथकाने केली.




























































